Crime News : इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चच्या (IISER) च्या ३९ वर्षीय शास्त्रज्ञाची हत्या करण्यात आली. पार्किंगवरुन झालेल्या वादात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
कुठे घडली घटना?
पंजाबच्या मोहाली सेक्टर ६६ मध्ये पार्किंगवरुन वाद झाला. या वादातून अभिषेक स्वर्णकार या शास्त्रज्ञाची हत्या करण्यात आली. अभिषेक स्वर्णकार यांच्यावर त्यांच्या शेजाऱ्याने पार्किंगच्या वादातून हल्ला केला. आयआयएसइआर चे वैज्ञानिक अभिषेक स्वर्णकार मूळचे पश्चिम बंगालचे राहणारे होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं. अभिषेक स्वर्णकार यांचं डायलिसिस सुरु होतं. मोहाली या ठिकाणी ते त्यांच्या वृद्ध आई वडिलांसह भाडे तत्त्वावरच्या घरात वास्तव्य करत होते.
अभिषेक यांच्या कुटुंबाने काय आरोप केला आहे?
अभिषेक यांच्या कुटुंबाने आरोप केला आहे की त्यांचा शेजारी माँटी हा आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. अभिषेक यांची शस्त्रक्रिया झाली आहे हे त्याला माहीत होतं. तरीही त्याने अभिषेक यांना मारहाण केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या प्रकरणी अभिषेक स्वर्णकार यांच्या कुटुंबाने पोलिसात माँटीच्या विरोधात तक्रार केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. तसंच पोलिसांनी सांगितलं की गुरुवारी म्हणजे आज अभिषेक यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं जाईल. तसंच योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलं आहे.
IISER ने काय सांगितलं?
IISER ने सांगितलं की अभिषेक स्वर्णकार यांचा शोध प्रबंध जर्नल ऑफ सायन्स मध्ये प्रकाशित झाला होता. त्यामुळेच त्यांना IISER मध्ये नोकरी मिळाली. तसंच अभिषेक स्वर्णकार यांच्या मृत्यूच्या घटनेवर या संस्थेने शोक व्यक्त केला आहे. आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी ही मागणी IISER ने केली आहे.
नेमकं काय घडलं?
अभिषेक स्वर्णकार यांनी विदेशात जाऊनही त्यांचं काम केलं होतं. मात्र आरोग्यविषयक समस्या सुरु झाल्याने अभिषेक भारतात परतले होते. त्यांना त्यांच्या एका बहिणीने किडनी दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक आणि माँटी यांच्यातला वाद रात्री ८.३० च्या दरम्यान सुरु झाला. त्यानंतर वाद विकोपाला गेलेल्या चिडलेल्या माँटीने स्वर्णकार यांना शिव्या दिल्या आणि जमिनीवर ढकलून मारहाण करण्यास सुरुवात केली. अभिषेक स्वर्णकार यांना माँटीने एकामागोमाग एक ठोसे मारले.ज्यामुळे स्वर्णकार यांना गंभीर दुखापत झाली.
प्रत्यक्षदर्शी रोमा यांनी काय सांगितलं?
ही घटना पाहणाऱ्या रोमा यांनी सांगितलं की मला आरडाओरड ऐकू आल्याने मी बाहेर गेले. त्यावेळी माँटी अभिषेक स्वर्णकार यांना मारहाण करत होता. त्याने अभिषेक यांना खाली पाडलं आणि जोरजोरात ठोसे मारले. अभिषेक जेव्हा यामुळे बेशुद्ध झाले तेव्हा माँटी घाबरला. त्यानंतर अभिषेक यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. माँटीच स्वर्णकार यांना रुग्णालयात घेऊन गेला. दरम्यान डॉक्टरांनी स्वर्णकार यांना मृत घोषित केलं. टाइ्म्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.