Crime News in Odisha : ओडिशाच्या बालंगीर जिल्ह्यातील एका २० वर्षीय आदिवासी तरुणीवर अत्याचार करून तिला मानवी विष्ठा खायला लावल्याचा धक्कायाक प्रकार समोर आला आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
१६ नोव्हेंबर रोजी ही तरुणी गावातील तलावात आंघोळ करून घरी परतत असताना ही घटना घडली. गावातील रहिवासी अभय बाघ याने तिच्यावर हल्ला केला आणि जातीवाचक अपशब्द वापरल्याचा आरोप तिने केला आहे. तरुणीने बांगोमुंडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. बाघने तिच्या छातीवर वार केल्याने ती खाली पडल्याचे तिच्या तक्रारीत म्हटले आहे. जेव्हा तिच्या वृद्ध आईने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या व्यक्तीने गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि शाब्दिक शिवीगाळ केली. या तरुणीने पुढे असा आरोप केला आहे की बाघने तिचा चेहरा मानवी विष्ठेने मळवला आणि जबरदस्तीने तिच्या तोंडात कोंबण्यात आला.
याप्रकरणातील आरोपीने तिच्या शेतजमिनीवर ट्रॅक्टर चालवून तिच्या पिकांचं नुकसान केलं होतं. याबद्दल तिने जाब विचारला होता. त्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप या संबंधित तरुणीने केला आहे. कांताबंजी उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) गौरांग चरण साहू यांनी आरोपी फरार असल्याचं सांगितलं असून त्याला अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा >> भाजपाला पाठिंबा दिला म्हणून दलित तरुणीचा खून; उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीतील घटनेने खळबळ
स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा
m
या घटनेमुळे स्थानिक आदिवासी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांना तातडीने न्याय देण्याची मागणी होत आहे. आदिवासी कल्याण संघाच्या सदस्यांनी आरोपींवर कठोर कारवाईची हाक दिली असून प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अजित जोशी यांनी या हल्ल्याचा निषेध करत हे निंदनीय कृत्य असल्याचे वर्णन केले. जिल्हा प्रशासनाला विनाविलंब आरोपींना अटक करून न्याय मिळवून देण्याची विनंती त्यांनी केली. पुढील पोलीस तपास सुरू आहे.
© IE Online Media Services (P) Ltd