नियोजित विवाहसोहळ्यासाठी साड्या खरेदी करायच्या असून, तू मला भेट, असा मेसेज करून त्याने होणाऱ्या बायकोला बोलावून घेतलं आणि त्यानंतर तिचा मृतदेहच रस्त्याकडेला सापडला. ही हादरवून टाकणारी घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील मोरादाबादमध्ये. पती जितीनने होणाऱ्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याचं आता समोर आलं असून, खून करण्यामागच्या कारणाचाही उलगडा झाला आहे.
टीना आणि जितीन यांचं लग्न जमलं होतं. त्यांच्या लग्नाची तारीखही निश्चित करण्यात आली होती. दरम्यान, सोमवारी टीनाला जितीनने (होणारा पती) कॉल केला. लग्नासाठी साड्या खरेदी करायच्या असून, मला तू भेट, असं जितीनने टीनाला सांगितलं. त्यानंतर टीनाला तिच्या आईने जवळच्या बसस्थानकापर्यंत सोडलं. सकाळी ११ वाजेच्या सुमारास टीनाला तिच्या आईनं सोडलं होतं, अशी माहिती लग्नासाठी आलेल्या टीनाचा नातेवाईक विपीन याने दिली.
जितीन दुपारी घरी आला, मात्र टीना कुठेही दिसत नव्हती. तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. पण तिचा ठिकाणा सापडत नव्हता. त्यानंतर दुपारी २:३० वाजेच्या सुमारास पोलिसांना एका गावाजवळ रस्त्याच्या कडेला पडलेला टीनाचा मृतदेह आढळून आला. याची माहिती पोलिसांनी टीनाच्या घरी दिली. जितीनला भेटायला गेलेली टीना काही तासानंतर मृतावस्थेत सापडली, असं कुटुंबियांनी सांगितलं.
टीनाचा मृतदेह कुटुंबियांनी ओळखल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी जितीनला अटक केली. जितीनला टीनाशी लग्न करायचं नव्हतं त्यामुळे जितीनने तिची गळा दाबून हत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. टीना आणि जितीन यांचा प्रेमविवाह होता आणि जितीनला लग्न करायचंच नव्हतं, तर त्याने लग्नास नकार द्यायचा होता, असं टीनाच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे.