Crime News : १७ वर्षांच्या बलात्कार पीडितेवर पुन्हा बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी एका पोलीस हवालदाराला अटक केली आहे. खाकी वर्दी म्हणजे सामान्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी मात्र या खाकीलाच काळीमा फासण्याचं काम या हवालदाराने केलं आहे. कर्नाटकातल्या बंगळुरु या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे.

नेमकी काय घडली घटना?

बंगळुरु या ठिकाणी एका १७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. तिचा मित्र विकी याने या मुलीला लग्नाचं वचन दिलं आणि तिच्यावर बलात्कार केला आणि तिचं लैंगिक शोषण केलं. यानंतर या मुलीने तिच्या आईला घडला प्रकार सांगितला. आईने तिच्यासह पोलीस ठाणं गाठलं. बोमन्नाहळ्ळी पोलीस ठाण्यात पीडिता आणि तिच्या आईने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. या ठिकाणी काम करणाऱ्या हवालदार अरुण याने या मुलीची तक्रार लिहून घेतली. तुला न्याय मिळेल तू घाबरु नकोस असं अरुण नावाच्या हवालदाराने पीडितेला सांगितलं. त्यानंतर या मुलीला बंगळुरुतल्या हॉटेलवर बोलवलं. तिथे त्याने या पीडितेवर बलात्कार केला. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

अरुणने पीडितेला हॉटेलवर बोलवल्यानंतर काय घडलं?

पीडितेच्या आरोपानुसार अरुण या हवालदाराने तिला हॉटेलवर बोलवलं. त्यानंतर त्याने मद्याच्या बाटलीत काही उत्तेजक द्रव्य मिसळली आणि ते मद्य या मुलीला प्यायला लावलं. त्यानंतर अरुणने पीडितेवर बलात्कार केला आणि त्याचं व्हिडीओ चित्रीकरण केलं. या प्रकाराबाबत कुठे बोललीस तर तुझे व्हिडीओ लीक करेन अशी धमकी त्याने पीडितेला दिली. मात्र या पीडितेने सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी या प्रकरणात या मुलीचा मित्र विक्की आणि हवालदार अरुण या दोघांनाही अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पीडितेचा जबाब पुन्हा नोंदवून घेतला आहे. तसंच अटक कऱण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करण्यात येते आहे. पुढील तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

बंगळुरुमध्ये याच महिन्यात एका महिलेवर सामूहिक बलात्कार

काही दिवसांपूर्वीच बंगळुरुमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली होती. एका मुलीवर तिच्या मित्रासह चार जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणात पीडितेने तक्रार केल्यानंतर या चौघांनाा अटक करण्यात आली होती. पीडिता दिल्लीत राहते. ती कामानिमित्त बंगळुरुला आली होती. त्यावेळी तिला तिचा मित्र भेटला. त्याने तिला एका हॉटेलमध्ये भेटायला बोलवलं. त्यावेळी त्याच्याबरोबर आणखी चार जण होते. या चौघांनी सदर महिलेला हॉटेलच्या छतावर नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही घटना ताजी असतानाच आता बलात्कार पीडितेवर पोलीस हवालदाराने बलात्कार केल्याची घटना पुन्हा एकदा बंगळुरुमध्ये घडली आहे.

Story img Loader