३० वर्षांच्या एका महिलेने बारावीतल्या मुलाशी लग्न करण्यासाठी हिंदू धर्म स्वीकारला आहे. एवढंच नाही तर तीन मुलांच्या आईने प्रियकराशी लग्न करण्यासाठी तिच्या दुसऱ्या नवऱ्याला आणि तीन मुलांना सोडून दिलं आहे. शबनम नावाच्या ३० वर्षीय महिलेने तिच्या दुसऱ्या नवऱ्याला आणि तीन मुलांना सोडून दिलं आहे. बारावीत शिकणाऱ्या एका मुलाशी तिने लग्न केलं आहे.

ही घटना कुठे घडली?

३० वर्षीय शबनमने हिंदू धर्म स्वीकारला आणि शिवानी हे नाव स्वीकारलं. त्यानंतर १२ वीत शिकणाऱ्या प्रियकराशी लग्न केलं. ही घटना उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील आहे. हंसपूर सर्कल पोलीस ठाण्याचे अधिकारी दीप कुमार पंत यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार शिवानीचं पूर्वीचं नाव शबनम असं होतं आणि तिची दोन लग्न झाली आहेत. नवऱ्याला घटस्फोट देत शबनमने हिंदू धर्म स्वीकारला आणि शिवा नावाच्या १२ वीला शिकणाऱ्या तरुणाशी लग्न केलं आहे.

लग्नानंतर दोघांनी पोस्ट केला व्हिडीओ

पोलिसांनी दिलेल्या माहितीतीनुसार शिवानी आणि शिवा या दोघांनी लग्नानंतर त्यांचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये शिवानी म्हणते आहे की ती लग्नानंतर आनंदी आहे आणि तिला तिच्या पतीला म्हणजेच शिवाला कुणीही त्रास देऊ नये. शिवानीची एकूण दोन लग्नं यापूर्वी झाली आहेत. ९ वर्षांपूर्वी तिचं दुसरं लग्न तौफिकसह झालं होतं. या दोघांना तीन मुली आहेत.

वर्षभरापूर्वी काय घडलं?

वर्षभरापूर्वी तौफिकचा अपघात झाला आणि तो शारिरीकदृष्ट्या कमकुवत झाला. दरम्यान तौफिक ई रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होता. याच कालावधीत शबनम उर्फ शिवानी शिवा नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली. त्यानंतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

पोलिसांनी आणखी काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवानीची पहिली भेट २०११ मध्ये एका विवाहीत माणसाशी झाली होती. हे दोघं मेरठमध्ये भेटले. त्यानंतर या दोघांनी लग्न केलं. पण नंतर दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर शबनमच्या आयुष्यात तौफिक आला. तौफिक आणि तिचं लग्न झालं. आता तिचा तो संसारही मोडला आहे तिने शिवा नावाच्या बारावीत शिकणाऱ्या मुलाशी लग्न केलं आहे. त्यासाठी तिने धर्मांतर करुन शिवानी हे नावही घेतलं आहे.

हे सगळं प्रकरण पंचायतीपुढे गेल्यानंतर पंचायतीने सांगितलं ती महिला म्हणजेच शिवानी कुठेही राहू शकते. ६ एप्रिल रोजी शिवानीने एका मंदिरात शिवाशी लग्न केलं. शिवा हा १२ वीमध्ये शिकणारा विद्यार्थी आहे. मी मॉर्निंग वॉकला जायचो तिथेच शबनम यायची. त्यामुळे आमची ओळख झाली आणि नंतर आम्ही प्रेमात पडलो असं शिवाने सांगितलं आहे.