देशात प्रचंड महागाई वाढल्याचं आपण नेहमीच ऐकतो. या महागाईची टक्केवारीही आपण नेहमी देत असतो. घर खर्च चालवताना आपल्याला पैसे अपुरे पडू लागले, की या महागाईच्या टक्केवारीचा परिणाम आपल्याला अचानक जाणवायला लागतो. पण त्याचं नेमकं प्रमाण मात्र आपल्याला सांगता येत नाही. पण वाढत्या महागाईचा आपल्या ताटातल्या जेवणावर कसा परिणाम होतो, याची आकडेवारी आता समोर आली आहे. अगदी हल्लीच झालेल्या टोमॅटोच्या प्रचंड दरवाढीचा आपल्याला कसा फटका बसला, याची आकडेवारी Crisil या कंपनीनं केलेल्या बाजारपेठ अभ्यासातून मांडली आहे.
कशी काढली किंमत?
घरात एक व्हेज थाळी किंवा एक नॉन व्हेज थाळी तयार करण्यासाठी सरासरी किती खर्च येतो, याची माहिती देशाच्या चारही दिशांना असणाऱ्या रोजच्या वापराच्या भाजीपाल्याच्या किंमतींचा अंदाज घेऊन काढली जाते. यामध्ये दर महिन्याला होणारा किंमतीतील बदल सामान्य माणसाच्या खिशावर पडणाऱ्या ताणाविषयीचा अंदाज वर्तवतात. याशिवाय, धान्य, मसाले, तेल, स्वयंपाकाचा गॅस यांच्या किंमतींचाही आधार थाळीच्या एकूण किमतीमध्ये घेतला जातो.
व्हेज थाळीचा सरासरी खर्च २४ टक्क्यांनी वाढला
क्रिसिलनं दिलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात व्हेज थाळी तयार करण्याचा वार्षिक सरासरी खर्च २४ टक्क्यांनी वाढल्याच दिसून आलं. महिन्याचा सरासरी खर्च ३४ रुपयांवरून ३३.८ असा किंचितसा कमी झाला असला, तरी वार्षिक सरासरी खर्च वाढला असून त्यासाठी टोमॅटोच्या किंमतीत झालेली वाढ कारणीभूत असल्याचं यात म्हटलं आहे.
शाकाहारी थाळीच्या किमतीतील २४ टक्के वाढीपैकी २१ टक्के एकट्या टोमॅटोच्या दरवाढीमुळे वाढल्याचं यात नमूद केलं आहे. टोमॅटोचे सरासरी वार्षिक दर यावेळी तब्बल ३७ रुपये प्रतिकिलोवरून १०२ रुपये प्रतिकिलो इतके वाढल्याचं दिसून आलं. याशिवाय कांद्याच्या किमतीत ८ टक्के, लाल तिखटाच्या किमतीत २० टक्के अशी दरवाढ झाल्याचं पाहायला मिळालं. याचा परिणाम एकूण थाळीच्या मूल्यवाढीवर झाला.
नॉन व्हेज थाळीचा सरासरी खर्च १३ टक्क्यांनी वाढला
व्हेज थाळीपेक्षा नॉन व्हेज थाळीचा खर्च वाढण्याचा वेग काहीसा कमी राहिला. हा खर्च १३ टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं आहे. या खर्चामध्ये सर्वाधिक ५० टक्क्यांहून जास्त खर्च हा मांस खरेदीसाठी होतो. मात्र, त्याच्या किमतीमध्ये १ ते ३ टक्के इतकी अल्पशी दरवाढ झाल्यामुळे हा वेग कमी राहिला आहे.
लोक मांसाहारी झाल्याने हिमाचलमध्ये ढगफुटी, IIT मंडीच्या संचालकांचा अजब दावा!
जुलैमध्ये अचानक वाढला खर्च
एप्रिल २०२२ ते जून २०२३ या काळात व्हेज व नॉन व्हेज थाळीचा एकूण खर्च काहीसा स्थिर राहिल्याचं दिसून आलं. एप्रिल महिन्यात व्हेज थाळीसाठी २४.९ रुपये तर नॉन व्हेज थाळीसाठी ५९.३ रुपये खर्च होत होता. हा खर्च जून २०२३ पर्यंत व्हेज थाळीसाठी २६.५ रुपये तर नॉन व्हेज थाळीसाठी ६०.४ रुपये इतकाच बदलला होता. मात्र, जुलैमध्ये तो अनुक्रमे ३४ रुपये व ६७.६ रुपये इतका वाढला. तर ऑगस्टमध्ये हा खर्च अनुक्रमे ३३.८ रुपये व ६७.३ रुपये इतका होता. यासाठी टोमॅटोची दरवाढ कारणीभूत ठरल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.