स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीवरून आंध्र प्रदेशात उसळलेल्या जनक्षोभास काँग्रेस पक्ष जबाबदार आहे, असा थेट आरोप भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी येथे केला. स्वतंत्र तेलंगणाशी संबंधित असलेल्या सर्व घटकांना केंद्र सरकारने चर्चेसाठी आमंत्रित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
स्वतंत्र तेलंगण राज्याची प्रक्रिया सुरू झाल्याने आंध्र प्रदेशच्या सीमांध्र भागात सध्या मोठा जनक्षोभ उसळला आहे. स्वतंत्र तेलंगणाच्या विरोधात असणाऱ्यांनी उग्र आंदोलन छेडले असल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली. आंध्र प्रदेशाच्या सीमांध्र भागात सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे, मात्र काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव असल्यानेच ही अराजकता निर्माण झाली आहे, काँग्रेसमध्ये प्रचंड वैचारिक गोंधळ यास कारणीभूत आहे, असा आरोप राजनाथ यांनी केला. तेलंगणचा प्रश्न चिघळल्यानंतरही काँग्रेसला त्याचे काहीच वैषम्य वाटत नाही, ही अराजकता आटोक्यात आणण्यासाठी केंद्र वा राज्य सरकारकडून कोणतीच उपाययोजना होताना दिसत नाही, असा आरोप त्यांनी केला.

Story img Loader