पीटीआय, रांची

बांगलादेशी घुसखोरांना पाठिंबा दिल्याने झारखंडमधील ‘झारखंड मुक्ती मोर्चा’च्या (जेएमएम) नेतृत्वाखालील सरकार हे घुसखोरांची आघाडी आणि माफियांचे गुलाम असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथील सभेत केली. झारखंडमधील आघाडीच्या नेत्यांनी केलेले घोटाळे एकप्रकारे उद्याोग बनले आहेत. भ्रष्टाचाराने या राज्याला गिळंकृत केल्याचा हल्लाबोलही मोदींनी केला.

येत्या १३ आणि २० नोव्हेंबरला झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक होत असून, या निवडणुकीच्या निमित्ताने सोमवारी पंतप्रधान मोदी यांची पहिल्यांदाच झारखंडमधील गढवा येथे सभा झाली. या वेळी त्यांनी झारखंडमधील सत्ताधारी आघाडीला लक्ष्य केले. झारखंडमध्ये तुष्टीकरणाचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. येथे ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील युती बांगलादेशी घुसखोरांना पाठिंबा देण्यात व्यग्र आहे. हे असेच चालू राहिल्यास राज्यातील आदिवासींची लोकसंख्या कमी होईल. हा आदिवासी समाज आणि देशासाठी धोका आहे.भ्रष्टाचाराने देशाला पोखरले आहे. झारखंडमध्ये ‘झामुमो’, ‘काँग्रेस’ आणि ‘राजद’ने भ्रष्टाचाराच्या बाबतीत सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. याचा गरीब, दलित, आदिवासी आणि मागासलेल्या समुदायांवर परिणाम होत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

हेही वाचा >>>Sisamau Bypolls 2024: कानपूरमध्ये सपा उमेदवाराने मंदिरात पूजा केल्याने राजकीय वाद; नसीम सोलंकी यांच्याविरोधात काढला फतवा

या राज्यात केवळ भाजपच सुविधा, सुरक्षा, स्थिरता आणि समृद्धी देऊ शकते, जी मोदींची गॅरंटी आहे, असेही मोदी म्हणाले. झारखंडमध्ये जेएमएम, काँग्रेस आणि राजद बांगलादेशी घुसखोरांचा मतपेढी म्हणून वापर केला जात आहे. त्यांना येथे स्थीरस्थावर होऊ दिले जात असून, हे राज्याच्या सामाजिक संरचनेसाठी धोकादायक आहे. याच पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये सध्या भाजप-रालोआ सरकार येणे गरजेचे असून, ‘रोटी, बेटी, माटी पुकार’चा नाराही मोदींनी या वेळी दिली.

Story img Loader