नवी दिल्ली: काँग्रेसने संविधानाचे रक्षणकर्ता असल्याचाही खोटेपणा केला आहे. आणीबाणी लादून क्रुरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. दलित, ओबीसींवर अन्याय केला. काँग्रेसच्या दलित विरोधी धोरणांमुळेच डॉ. आंबेडकरांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. डॉ. आंबेडकरांना निवडणुकीत पराभूत केले गेले, त्यांचा पराभव साजरा केला गेला. इंदिरा गांधी मंडलविरोधी होत्या. राजीव गांधी आरक्षणविरोधी होते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यानच्या उत्तरात केला.

गेल्या तीन निवडणुकीत काँग्रेसला शंभर जागादेखील मिळवता आलेल्या नाहीत. काँग्रेसना खोटेपणाला राजकारणाचे हत्यार बनवले आहे. काँग्रेसने देशाची दिशाभूल केली आहे. महिलांना ८,५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, तिचे काय झाले? काँग्रेसने मतदानयंत्र, संविधान, आरक्षण, राफेल, एचएएल, एलआयसी, बँक अशा अनेकांबद्दल खोटे बोलण्याचा प्रयत्न केला. खोटेपणा काँग्रेसच्या नसानसांत मुरलेला असून हा खोटेपणा जनतेच्या विवेकाच्या कानाखाली मारण्याचा निर्लज्जपणा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसला तिसऱ्यांदा विरोधी बाकांवर बसण्याचे जनमत मिळाले आहे.

मोदींचे भाषण सुरू असताना काँग्रेसह ‘इंडिया’ आघाडीतील सर्व घटक पक्षांनी सभागृहात मोदीविरोधी घोषणाबाजी करून गोंधळ केला. मोदींनी भाषणादरम्यान तीन-चार वेळा पाणी पिण्यासाठी क्षणभर थांबले. एकदा तर मोदींनी घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांना पाण्याचा ग्लास देऊ केला. पण, नम्रतेने टागोरांनी तो नाकारला! विरोधक तब्बल दोन तास न थकता घोषणाबाजी करत होते.

सबका साथ, सबका विकास हीच धर्मनिरपेक्षता

सबका साथ, सबका विकास या भावनेने दहा वर्षे एनडीए सरकार देशाची सेवा करत आहे. आम्ही कधीही तुष्टीकरणाचे राजकारण केले नाही, संतुष्टीकरण हेच आमचे धारण राहिले आहे. त्यामुळे सरकारच्या सर्व योजना दशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कष्ट करत आहोत. हाच सेक्युलॅरियमझचा खरा अर्थ आहे. म्हणूनच जनतेने एनडीए सरकारला सलग तिसऱ्यांदा निवडून दिले आहे. जनतेच्या विवेकाने हा निर्णय घेतला आहे, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

हिंदूंची चेष्टा करणे काँग्रेसची फॅशन!

काँग्रेससाठी हिंदूंची चेष्टा करणे, त्यांचा अपमान करणे ही फॅशन झाली आहे, अशी टीका करत मोदींनी राहुल गांधींचा चोख उत्तर दिले. काँग्रेस हिंदूविरोधी असून हिंदू हिंसा करणारे असल्याचा काँग्रेसचा आरोप देश शतकानुशतके विसरू शकणार नाही. हिंदू शक्ती नष्ट करण्याची भाषा काँग्रेस करत आहे. काँग्रेसनेच हिंदू दहशतवाद हा शब्द आणला. हिंदूंची तुलना डेंग्यू, मलेरियाशी केली गेली. काँग्रेसला देश कधीही माफ करणार नाही, असे मोदी म्हणाले.

पेपरफुटीविरोधात सज्जड इशारा

पेपरफुटीच्या प्रकरणातील दोषींवर आम्ही कठोर कारवाई करू. यासंदर्भात कारवाई सुरू आहे. केंद्राने पेपरफुटीविरोधात कायदाही केला असून त्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा मोदींनी दिला.

बालकबुद्धी आणि शोलेची मावशी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींचे नाव घेता त्यांची बालकबुद्धी अशी निर्भत्सना केली. काँग्रेसचा हा बालक विनाकारण कांगावा करत असून ९९ टक्के गुण मिळवल्याची घमेंड दाखवत फिरत आहे. पण, त्याने १०० पैकी ९९ नव्हे तर ५४३ जागांमध्ये ९९ जागा मिळवल्या आहेत हे वास्तव लपवून ठेवत आहे. काँग्रेसच्या या बालबुद्धीला कोण समजून सांगणार? त्याने तर नापास होण्याचा विक्रम केला आहे, अशी उपहासात्मक टीका मोदींनी केली. ही बालबुद्धी लाचखोरीच्या प्रकरणात जामिनावर सुटली आहे. ओबीसींना चोर म्हटल्याप्रकरणी तिला शिक्षा झाली आहे. तिला सर्वोच्च न्यायालयाची माफी मागावी लागली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी तिच्या विरोधात खटला चालवला जात आहे. या बालकबुद्धीला ना बोलण्याचे भान आहे ना तिला व्यवहार समजतात. बालबुद्धी एखाद्याचा कब्जा घेते तेव्हा संसदेच्या सभागृहातही ती मर्यादा सोडून वागते. कोणाला मिठी मारते आणि मग डोळेही मारते. लोकांना काँग्रेसच्या या बालबुद्धीची कल्पना असल्यानेच तुझ्याकडून काही होऊ शकणार नाही असे लोकांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्टपणे सांगितले आहे, असे मोदी म्हणाले.