सचिन-सीम हैदर आणि अंजू-नसरुल्ला यांच्या सीमापार प्रेमकहाण्या अद्यापही चर्चेचा विषय बनल्या आहेत. सोशल मीडिया, प्रसारमाध्यमे, राजकारणी आणि सर्वसामान्य लोकही या प्रेमकहाण्यांवर बोलताना दिसतात. असे असताना आता आणखी एका प्रकरणाने यात भर घातली आहे. पाकिस्तानच्या एका महिलेने राजस्थानच्या जोधपूरमधील एका तरुणाशी लग्न केल्याची माहिती समोर आली आहे.

‘इंडिया टूडे’च्या वृत्तानुसार, पाकिस्तानमधील कराचीमध्ये राहणाऱ्या अमीना नावाच्या तरुणीने भारतीय व्हिसा न मिळाल्यानंतरही राजस्थानच्या जोधपूरमध्ये राहणाऱ्या अरबाजशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अरबाज आणि अमीनाने बुधवारी रात्री (२ ऑगस्ट) सर्व विधी पूर्ण करून ऑनलाईन पद्धतीने विवाह केला. भारत आणि पाकिस्तानमधील काझींनी हा निकाह पार पाडला आणि दोघांना सुखी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

चार्टर्ड अकाउंटंट अरबाज खान आपल्या मित्र आणि कुटुंबीयांसोबत जोधपूरच्या ओसवाल समाज भवनात पोहोचला. यावेळी दोघांचा केवळ ऑनलाईन निकाहच पार पडला नाही, तर कुटुंबीयांनीही उत्सवात सहभागी होऊन अरबाजला लग्नाचे सर्व विधी करायला लावले. यावेळी दोन्ही बाजूंचे नातेवाईक आणि कुटुंबीय कार्यक्रमात सहभागी झाले होते. जोधपूरमध्ये वराच्या नातेवाइकांच्या साक्षीसाठी संपूर्ण लग्न एलईडी स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आले होते.

अरबाजने लग्नाबाबत बोलताना सांगितले की, तो लवकरच पत्नी अमीनाला भारतातील प्रवेशासाठी व्हिसा मिळावा यासाठी अर्ज करील. आमचे अनेक नातेवाईक पाकिस्तानात आहेत. आमच्या कुटुंबातील सदस्यांनी हा विवाह ठरवला आहे. पण, भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्व संबंधांमुळे आम्ही ऑनलाइन पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण आता आशा आहे की, अमीनाला व्हिसा मिळेल आणि ती लवकरच भारतात येऊ शकेल.

अरबाज याने पुढे सांगितले की, आम्ही पाकिस्तानात लग्न केले असते, तर या लग्नाला भारतात कायदेशीर मान्यता मिळाली नसती. पण आता अधिकृत लग्नासाठी आणि भारतीय निकाहनामासह व्हिसासाठी अर्ज केल्याने ही प्रक्रिया आणखी सुलभ होईल, अशी आशा बाळगतो.

अरबाजच्या वडिलांनी वधूच्या आगमनासाठी कुटुंब खूप उत्सुक असल्याचे म्हटले आहे. तसेच ऑनलाइन विवाह सामान्य कुटुंबांसाठी चांगला आहे. कारण- कमी खर्चात विवाहाच्या पवित्र बंधनाशी संबंधित प्रथा पूर्ण करता येतात, असे मत नोंदवले. ते पुढे म्हणाले की, वधूचे कुटुंब साधे आहे. या लग्नाला फारसा खर्च आला नाही.