पंकज भोसले, लोकसत्ता
जयपूर : करोनानंतरच्या दोन वर्षांत बदललेली भीतीची मिती, गीतांजली श्री यांना आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळाल्यानंतर हिंदी पट्टयात सक्रिय झालेल्या साहित्यरुचीचा प्रभाव आधीच गर्दीसज्ज असलेल्या जयपूर साहित्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गेल्या दोन वर्षांहून तिप्पट वाचकांची भर देऊन गेला. वाचकप्रिय लेखकांनी या महोत्सवाचे दोन्ही दिवस गाजवले.
‘प्रॉफेट साँग’ या कादंबरीसाठी यंदाचा बुकर पारितोषिक विजेता आयरिश लेखक पॉल लिन्च, चार डझनांहून अधिक प्रकाशकांकडून पुस्तक नाकारल्यानंतर ‘लेसन्स इन केमिस्ट्री’ या कादंबरीसह पासष्टाव्या वर्षी लेखिका बनलेली जर्मन-अमेरिकी लेखिका बॉनी गारमस आणि भारतातील कित्येक पिढयांना आपल्या शब्दचर्येत तरंगत ठेवणाऱ्या लेखक-कवी गुलजार यांना ऐकण्यासाठी तरुणांसह हजारोंची थक्क करणारी उपस्थिती थक्क करणारी होती. मिथक कादंबऱ्यांनी देशी भाषांमध्ये भराभर अनुवादित झालेला अमिष त्रिपाठी आणि कित्येक हिंदी लेखक या सोहळयात यंदा आकर्षणाचे विषय बनले.
हेही वाचा >>> खासदाराच्या विधानामुळे काँग्रेसची कोंडी; ‘विरोधकांच्या सभात्यागानंतर संसदेत भाजप आक्रमक
‘माझी ‘प्रॉफेट साँग’ ही कादंबरी राजकीय नाही. तर राजकारणामुळे त्रासाच्या फेऱ्यात अडकलेल्या सामान्य माणसांची गोष्ट आहे. जगातील सर्वच देशांत सामान्य माणसांना या स्थितीत नेणारी राजकीय परिस्थिती तयार होत आहे, असे मत पॉल लिन्च यांनी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी झालेल्या चर्चासत्रात मांडले.
गेल्या दीड वर्षांतील वाचकप्रिय लेखिका बनलेल्या बॉनी गारमस, पुणेकर आंग्लभाषिक लेखिका देविका रेगे आणि फ्रेंच लेखिका कोयल पुरी रिंचेट यांच्या पहिल्या कादंबरीवरील चर्चासत्राला ऐकण्यासाठी लेखनेच्छुकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. अमिष त्रिपाठी यांनी आपल्या मिथक कथांच्या निमित्ताने रामायण, राम, मूर्तिपूजेतील शक्ती यांविषयी बरीच चर्चा केली.
गुलजार यांच्यावर यतिंद्र मिश्रा यांनी लिहिलेल्या ‘गुलजार साब : हजार राहें मुडके देखे’ या ग्रंथाच्या सथ्या सरन यांनी केलेल्या अनुवादाच्या दुसऱ्या आवृत्तीनिमित्ताने झालेल्या या तिघांच्या संवाद कार्यक्रमाने ‘फ्रण्ट लॉन’ या परिसराच्या चहुबाजूंच्या गर्दीने रस्ताकोंडी केली.
रहस्यकथाप्रेमी गुलजार..
टागोरांच्या कवितेशी आणि लेखनाशी परिचय कधी झाला, यावरच्या प्रश्नाला उत्तर देताना चार आण्यात पंजाबी मालकाच्या वाचनालयातून आठवडयासाठी पुस्तके आणण्याची आठवण गुलजार यांनी सादर केली. या पुस्तकालयातील साऱ्या रहस्य आणि गूढकथांच्या पुस्तकांना मी आणत असे. ही सारी पुस्तके त्यातल्या रहस्याचा उलगडा झाल्याशिवाय थांबवता येत नसल्याने एका रात्रीत संपत. दुसऱ्या दिवशी पुस्तक बदलायला गेल्यानंतर तिथला मालक माझ्यावर खवळे. माझ्यावरच्या रागामुळे त्याने त्याच्या फडताळातील टागोरांचे उर्दू अनुवादित पुस्तक मला दिले. ते मी कधीच परत केले नाही. आयुष्यात मी चोरलेले ते पहिले पुस्तक होते, पण आयुष्यात मोठा बदल करणारे, असे गुलजार म्हणाले. पाकिस्तान मला शेजारच्या खोलीतील भिंतीइतका जवळ आहे, त्या भिंतीच्या खिडकीइतका समीप आहे. नऊ -दहा वर्षांच्या मुलाला आपल्या देशात घडणाऱ्या घटनांची जाणीव असणे शक्य नाही, पण माझ्या नजरेसमोर त्या वयातील माझ्या मोहल्ल्यातील लोकांना जिवंत जाळण्याच्या आठवणी आणि त्यापासून निघालेला भीषण दर्प अजून टिकून आहे. – गुलजार, लेखक-कवी