पीटीआय, चंडीगड : जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत मारल्या गेलेल्या लष्करी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गुरुवारी लोकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली. या चकमकीत तीन लष्करी अधिकारी आणि एक पोलीस अधिकारी मारले गेले. त्यानंतर देशभरात शोकसंतप्त प्रतिक्रिया उमटली. या हल्ल्याचा लष्कराने सडेतोड उत्तर द्यावे अशी मागणी काहीजणांनी केली.
कर्नल मनप्रीत सिंग यांच्या मोहालीमधील मुल्लनपूर येथील तर आणि मेजर आशिष धोंचक यांच्या पानिपतमधील निवासस्थानी मोठय़ा प्रमाणात लोक जमले. दोन्ही अधिकाऱ्यांचे मृतदेह त्यांच्या घरी पोहोचले नव्हते. ते गुरुवारी संध्याकाळी उशिरा किंवा शुक्रवारी सकाळी त्यांच्या घरी पोहोचतील असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. ‘सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करावा. सरकारने आता कठोर निर्णय घ्यावा’, अशी मागणी कर्नल सिंग यांच्या शोकात बुडालेल्या आई मनजित कौर यांनी केली. कौर यांनी रविवारी दुपारी आपल्या मुलाशी संभाषण केले होते. त्यावेळी त्यांनी लवकरच सुट्टीसाठी घरी येत असल्याचे आईला सांगितले होते. तर त्यांच्या बहिणीचे राखी पौर्णिमेच्या दिवशी भावाबरोबर बोलणे झाले होते.
त्यांचे काका हरमेल सिंग यांनी आपल्या पुतण्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले. मेजर आशिष धोंचक यांच्या नातेवाईकानेही त्यांनी देशासाठी बलिदान दिल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. कर्नल सिंग यांच्या आधीच्या दोन पिढय़ांनीही लष्करात कर्तव्य बजावून देशसेवा केली आहे. त्यांची पत्नी पंचकुला जिल्ह्यामध्ये शाळेत शिक्षिका आहेत. सिंग यांना दोन वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा आहे. तर मेजर आशिष धोंचक यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी, दोन वर्षांची मुलगी आणि तीन बहिणी आहेत.
जम्मूत पाकिस्तानविरोधात निदर्शने
लष्करी अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूच्या निषेधार्थ जम्मू शहराच्या विविध भागांमध्ये गुरुवारी पाकिस्तानविरोधात निदर्शने करण्यात आली. पनुन काश्मीर आणि एकम सनातन भारत दल यांनी ही निदर्शने आयोजित केली. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी यंत्रणेविरोधात मोठी कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
रक्तपात थांबवण्यासाठी चर्चा आवश्यक – अब्दुल्ला
जम्मू आणि काश्मीरमधील रक्तपात थांबवण्यासाठी चर्चा आवश्यक आहे असे मत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी गुरुवारी व्यक्त केली. चर्चा नसेल तर अशा घटना घडत राहतील असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला. युद्धामुळे भूतकाळात समस्या सुटल्या नाहीत आणि भविष्यात त्यामुळे शांतता नांदणार नाही असे ते म्हणाले.