दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे गुरुवारी (११ एप्रिल) सकाळपासून सुरक्षाबलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक चालू आहे. आतापर्यंत झालेल्या चकमकीत सीआरपीएफच्या जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं आहे. तर, एक दहशतवादी अद्याप या परिसरात लपून बसला असून सुरक्षाबलाचे जवान त्याचा शोध घेत आहेत. ज्या ठिकाणी हा दहशतवादी लपला असण्याची शक्यता आहे त्या परिसराला सीआरपीएफच्या जवानांनी घेराव घातला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की, पुलवामामधील फारसीपोरा भागात पोलीस आणि सुरक्षाबलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना शोधण्यासाठी संयुक्त शोधमोहिम राबवली. दरम्यान, सीआरपीएफचे जवान एका संदिग्ध गल्लीत तपास करत असतानाच दहशतवाद्यांनी सुरक्षाबलाच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षाबल आणि पोलिसांनीदेखील प्रतिहल्ला चढवला. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे.

ठार केलेल्या दहशतवाद्याचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दानिश एजाज शेख (३४) असं या दहशतवाद्याचं नाव आहे. पोलिसांनी सांगितलं की, तो मूळचा श्रीनगरमधल्या अहमदनगर येथील रहिवासी आहे. २७ मार्च रोजी तो बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत होते.

चार महिन्यांपूर्वी, १ डिसेंबर २०२३ रोजी पुलवामामधील अरिहाल गावात सुरक्षाबल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. त्या चकमकीतदेखील एक दहशतवादी ठार झाला होता. सीमेपलिकडील (पाकिस्तानमध्ये) तसेच काश्मीर खोऱ्यात लपून बसलेल्या दहशतवादी संघटना या जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकीच्या आधी वातावरण बिघडवण्याच्या प्रयत्नात आहेत. अनेक दहशतवादी संघटनांनी यासाठी वेगवेगळ्या दहशतवादी मोहिमा आखल्या आहेत. भारतीय गुप्तचर यंत्रणा या दहशतवाद्यांच्या मागावर आहेत.

हे ही वाचा >> Buddhism Separate Religion: ‘बौद्ध हा वेगळा धर्म, हिंदूंनी धर्मांतरासाठी संमती घेणं अनिवार्य’ गुजरात सरकारचं परिपत्रक चर्चेत

काश्मीर खोऱ्यात स्लीपर सेल सक्रीय?

गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार लष्कर ए तैय्यबाचा कमांडर जुनैद अहमद भट हा सध्या कुलगाममध्ये लपून बसला आहे. त्याने नुकतीच काही स्लीपर सेलबरोबर बैठक केली असून काश्मीर खोऱ्यात लष्करचे स्लीपर सेल सक्रीय केले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर दहशतवादी संघटना जम्मू काश्मीरमध्ये मोठा घातपात करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crpf killed 1 terrorist in pulwama encounter underway in south kashmir asc