नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनात प्रथमच एका लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अधिकारी पूनम गुप्ता यांच्या विवाहास राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी परवानगी दिली आहे. सीआरपीएफ अधिकारी पूनम गुप्ता यांनी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या पथसंचालनात सीआरपीएफच्या महिला पथकाचे नेतृत्व केले होते. अधिकारी पूनम गुप्ता यांच्या नेतृत्व आणि कार्यशैलीने राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू प्रभावित झाल्याची माहिती आहे. तसेच पूनम गुप्ता या राष्ट्रपती भवनात कार्यरत असून त्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या खासगी सुरक्षा अधिकारी (पीएसओ – पर्सनल सेक्युरिटी ऑफिसर) आहेत. पूनम गुप्ता यांच्या लग्न सोहळ्याचे आयोजन राष्ट्रपती भवनातील मदर तेरेसा क्राउन कॉम्प्लेक्समध्ये करण्यात आले आहे. १२ फेब्रुवारी रोजी हा लग्न सोहळा पार पडणार असल्याचे वृत्त ‘टाइम्स नाऊ’ने दिले आहे. या लग्न सोहळ्यासाठी काही ठराविक नातेवाईक तसेच मित्रमंडळींना आमंत्रित केले जाणार असल्याची माहिती आहे.
कोण आहेत पूनम गुप्ता ?
पूनम गुप्ता या केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) साहाय्यक कमांडंट या पदावर कार्यरत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनी पूनम गुप्ता यांनी सीआरपीएफच्या महिला पथकाच्या पथसंचलनाचे नेतृत्व केले.
गणितात पदवीचे शिक्षण घेतलेल्या पूनम गुप्ता यांनी इंग्रजी साहित्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ग्वालियर येथील जिवाजी विद्यापीठातून त्यांनी बी.एड केले आहे.
पूनम गुप्ता यांनी २०१८ मध्ये UPSC CAPF (सीएपीएफ – केंद्रीय सशस्त्र पोलीस दल) परीक्षेत देशात ८१ वा क्रमांक मिळवला होता. त्यानंतर त्यांची नियुक्ती बिहारमधील नक्षलग्रस्त भागात करण्यात आली होती.
पूनम गुप्ता या सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सीआरपीएफच्या गणवेशातील त्यांचे फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर आहेत. महिलांच्या समस्या व महिला सशक्तीकरणाबाबत त्या जागृत असून त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टद्वारे त्या तरुण-तरुणींना प्रोत्साहन देतात.
पूनम गुप्ता या इन्स्टाग्रामवर अभियान राबवून नागरिकांमध्ये जागृकता निर्माण करतात, तसेच त्या अभियांनाबाबत माहिती व अपडेट्स देणाऱ्या पोस्ट देखील शेअर करतात.