माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या पुण्यातील बंगल्याच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) सशस्त्र जवान नेमण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खूप वर्षांनी सीआरपीएफच्या जवानांकडे अशा पद्धतीने राष्ट्रपतींच्या बंगल्याच्या संरक्षणाची जबाबदारी देण्यात आलीये. सीआरपीएफकडे आतापर्यंत नक्षलविरोधी किंवा अन्य महत्त्वाच्या प्रसंगी कारवाई करण्याची जबाबदारी दिली जात होती. 
पुण्यातील पाषाण रस्त्यावरील पाटील यांच्या निवासस्थानाला सुरक्षा पुरविण्यासाठी २५ ते ३० जवानांची नेमणूक करण्याची सूचना गृह मंत्रालयाने सीआरपीएफकडे केली आहे. सीआरपीएफच्या उत्तर भारतातील बटालियनमधून या सैनिकांची नेमणूक केली जाणार आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने पाषाण रस्त्यावरील बंगला राष्ट्रपतींना देण्याचा निर्णय गेल्यावर्षी घेतला. पाटील यांच्या बंगल्यासाठी त्याआधी निवडलेली जागा लष्करासाठी राखीव असल्याने त्यावरून वाद निर्माण झाला होता.

Story img Loader