अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या कोळसा घोटाळ्यावर सर्वोच्च न्यायालयात आज (बुधवार) सुनावणी होणार आहे. कायदामंत्री तसेच पंतप्रधान कार्यालय आणि कोळसा मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी तपास अहवालात काही बदल केल्याचे प्रतिज्ञापत्र सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सादर केल्यामुळे सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारला अत्यंत कठीण प्रश्न विचारून कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
केंद्रीय कायदामंत्री अश्वनीकुमार हे सध्या वादाच्या गर्तेत सापडले असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अश्वनीकुमार यांच्यावर काही प्रतिकूल ताशेरे मारले तर त्यांची अवस्था अधिकच बिकट होणार आहे. संबंधित अहवालामध्ये सरकारच्या सल्लामसलतीने बदल केल्यानंतर आपल्याला अंधारात ठेवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालय याआधीच संतप्त झाले आहे. न्या. आर. एम. लोढा यांच्या त्रिसदस्यीय पीठाने आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे.

Story img Loader