Cruiser car falls into canal Accident : हरियाणामध्ये धुक्यामुळे भयानक अपघात झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी रात्री हरियाणाच्या फतेहाबाद येथे दाट धुक्यामुळे १२ प्रवासी असलेली क्रूझर कार भाकरा कॅनलमध्ये कोसळली असून १० जण बेपत्ता झाले आहेत. रात्री उशीरपर्यंत बचाव कार्य सुरू होते, पण प्रशासकीय अधिकार्यांनी १० वर्षीय मुलाला वाचवण्यात यश मिळाले तसेच एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार वाहनाचा चालक जरनैल सिंग याने वाहन पाण्यात पडण्याची आधीच बाहेर उडी घेतली आणि तो सुखरुप बचावला.
पंजाबमधील एका कार्यक्रमात सहभागी होऊन हे सर्वजण घरी परतत होते. रात्री १० च्या सुमारास सरदारेवाला गावाजवळ पुल ओलांडताना धुक्यामुळे व्यवस्थित दिसत नसल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे वाहन पुलावरून खाली कॅनलमध्ये कोसळले.
गाडी जेव्हा पाण्यात कोसळली तेव्हा त्यामध्ये १२ प्रवासी होते. बचाव पथकाने एका अरमान नावाच्या १० वर्षाच्या मुलाला वाचवले आहे, तर बलबीर सिंग (वय ५५) यांचा मृतदेह कॅनलमधून बाहेर काढला आहे.
या अपघाताबद्दल माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि पोलीस अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले. बचाव आणि मदत कार्य रात्रभर कॅनलमध्ये प्रवाशांचा शोध घेत होते.