अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी आयोवा प्रांतात झालेली निवडणूक पक्षाचे बहुचर्चित उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी गमावली आहे. सिनेटर आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार टेड क्रुझ यांनी ट्रम्प यांचा पराभव केला. या पराभवामुळे ट्रम्प यांच्या उमेदवारीसाठीच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.
टेक्सासमधून सिनेटर बनलेल्या क्रुझ यांना आयोवामधील निवडणुकीत २८ टक्के मते मिळाली तर ट्रम्प यांना केवळ २४ टक्के मतांवरच समाधान मानावे लागले. या निवडणुकीत फ्लोरिडातून सिनेटर झालेले मार्को रुबिओ तिसऱ्या स्थानावर फेकले गेले आहेत. रुबिओ यांना एकूण मतांपैकी २३ टक्केच मते मिळाली.
डेमॉक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या हिलरी क्लिंटन आणि त्यांचे प्रतिस्पर्धी बर्नी सॅंडर्स यांच्यामध्ये जवळपास टाय झाल्यासारखीच स्थिती आहे. हिलरी क्लिंटन यांना ५०.१ टक्के तर सॅंडर्स यांना ४९.३ टक्के मिळाली आहेत. मेरिलॅंडचे माजी गव्हर्नर मार्टिन ओमॅले यांना या निवडणुकीत केवळ ०.५ टक्केच मते मिळाल्यामुळे त्यांनी निवडणुकीतून बाहेर पडण्याचे जवळपास निश्चित केले आहे.