गेल्या काही महिन्यांपासून भारतात क्रिप्टोकरन्सीवरून बरीच चर्चा सुरू झाली आहे. त्यात केंद्र सरकारने देशातील क्रिप्टोकरन्सीवर नियंत्रण राखण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये विधेयक आणण्यावर काम सुरू केल्यामुळे क्रिप्टोकरन्सी हा विषय सर्वच स्तरावर चर्चिला जात आहे. अनेकांना क्रिप्टोकरन्सीचं आकर्षण देखील वाटू लागलेलं असताना दुसरीकडे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि नावाजलेले अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी मात्र क्रिप्टोकरन्सीबाबत मोठी भिती व्यक्त केली आहे. क्रिप्टोकरन्सी हा एक मोठा फुगा असल्याचं विधान त्यांनी केलं आहे. क्रिप्टोकरन्सीचं अर्थशास्त्र फसवं असल्याचं विश्लेषण त्यांनी केलं आहे.
बहुतांश क्रिप्टोकरन्सी बंद पडतील!
रघुराम राजन यांनी आगामी काळात बहुतांश क्रिप्टोकरन्सी या निकालात निघतील, असे सूतोवाच केले आहेत. “सध्या भारतात ६ हजाराहून जास्त क्रिप्टोकरन्सी आहेत. पण त्यापैकी बहुतांश येत्या काळात निकालात निघतील. अगदी एक, दोन किंवा बोटांवर मोजण्याइतक्याच क्रिप्टोकरन्सी तग धरू शकतील”, असं रघुराम राजन म्हणाले आहेत.
“जर कुणाला असं वाटत असेल की क्रिप्टोकरन्सीचं मूल्य आगामी काळात वाढू शकेल, तर तो फक्त एक भ्रमाचा फुगा आहे. अनेक क्रिप्टोकरन्सीचं मूल्य वाढण्यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे त्यांना खरेदी करणारे अजून मोठे मूर्ख देखील आहेत”, असं देखील रघुराम राजन यांनी नमूद केलं आहे.
क्रिप्टो चिटफंडसारखेच फसवे!
दरम्यान, रघुराम राजन यांनी क्रिप्टोकरन्सीची तुलना अनियंत्रितपणे चालवल्या जाणाऱ्या चिटफंडशी केली आहे. “क्रिप्टोकरन्सी एखाद्या नियंत्रण नसलेल्या चिटफंडशी केली जाऊ शकते. हे चिटफंड लोकांकडून पैसे घेतात आणि नंतर नामशेष होतात. आज क्रिप्टोकरन्सी खरेदी करणाऱ्या अनेकांना भविष्यात मनस्ताप सहन करावा लागणार आहे. अमेरिकेत क्रिप्टोकरन्सी एक २.५ ट्रिलियन डॉलर्सची अशी समस्या झाली आहे, ज्यावर कुणालाही नियंत्रण ठेवण्याची इच्छा नाही”, असं देखील रघुराम राजन म्हणाले.
क्रिप्टोकरन्सीला मूल्य आहे, पण…
दरम्यान, क्रिप्टोकरन्सी अजिबातच उपयोगी नाही, असं मात्र नसल्याचं राजन म्हणाले. “क्रिप्टोकरन्सी निरुपयोगीच आहे असं नाही. पण यातल्या बहुतेक क्रिप्टोकरन्सीला दीर्घकालीन मूल्य नाही. शिवाय, त्यातल्या काही फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर पेमेंट करण्यासाठीच अस्तित्वात राहतील”, असं रघुराम राजन यांनी नमूद केलं.