पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक इस्रायल दौऱ्याला मंगळवारपासून सुरूवात झाली. आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलमध्ये दाखल झाले. नरेंद्र मोदी हे इस्त्रायलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांचा हा दौरा दोन्ही देशांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळेच तेल अविवमध्ये दाखल झाल्या क्षणापासूनच इस्रायल सरकार मोदींची विशेष बडदास्त ठेवत आहे. या संपूर्ण दौऱ्यात इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामीन नेत्यानाहू मोदींसोबत असतील. यापूर्वी फक्त अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याच्या वेळीच इस्रायलचे पंतप्रधान पूर्णवेळ पाहुण्यांसोबत असायचे.

आज विमानतळावर मोदी आणि नेत्यानाहू यांनी एकमेकांची गळाभेट घेतल्यानंतर दोन्ही नेत्यांनी स्वागतपर भाषण केले. यावेळी ‘आपका स्वागत है मेरे दोस्त’ असं म्हणत इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी मोदींचे स्वागत केले. आमचे भारतावर प्रेम असून तुमची संस्कृती, इतिहास, लोकशाही आणि विकासासाठी असलेली कटीबद्धता याचा आम्हाला आदर आहे असे नेत्यानाहू यांनी म्हटले. मात्र, मोदींचा हा कौतुकसोहळा एवढ्यावरच थांबला नाही. स्वागत सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी नेत्यानाहू यांच्यासोबत अनेक ठिकाणी भेटी दिल्या. त्यावेळी एका ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे इस्रायलमध्ये मिळणाऱ्या गुलदाउदीच्या फुलांचा गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे इस्रायल सरकारकडून गुलदाउदीच्या फुलाला मोदींचे नाव देण्यात आले. त्यामुळे यापुढे इस्रायलमध्ये गुलदाउदीचे फूल ‘मोदी’ फूल म्हणून ओळखले जाईल.

‘आपका स्वागत है मेरे दोस्त’; इस्रायलच्या पंतप्रधानांकडून मोदींचे हिंदीत स्वागत

मोदींच्या दौऱ्यापूर्वीपासून इस्रायलमधील वातावरण मोदीमय झाल्याचे चित्र आहे. अनेक वृत्तपत्रांनी मोदींचे कौतुक केले होते. मोदी हे १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाचे नेते असून त्यांची लोकप्रियता सर्वाधिक आहे. जगात सर्वात झपाट्याने विकास करणाऱ्या अर्थव्यवस्थेचे ते प्रतिनिधीत्व करतात आणि यामुळेच ते दखलपात्र ठरतात, असे ‘द मार्कर’ या वृत्तपत्रात म्हटले होते. ‘द जेरुसलेम पोस्ट’ या न्यूजवेबसाईटने तर मोदींच्या दौऱ्यासाठी ‘मोदी व्हिझिट’ ही वेगळी लिंकच तयार केली होती. यावर मोदी आणि भारताविषयीच्या बातम्या देण्यात आल्या होत्या.

जाणून घ्या इस्रायल-भारत संबंधांचं अनोखं महाराष्ट्र कनेक्शन