सांस्कृतिक मंत्रालयाची गृहमंत्रालयाकडे शिफारस
स्वयंपाकी आणि बल्लवाचार्य (शेफ) यांनाही आता पद्म पुरस्काराने सन्मानित करण्याचा मार्ग मोकळा होण्याचे संकेत मिळाले आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाने या बाबतची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठविली आहे. स्वयंपाक ही एक कला असल्याने या पाककलेचा पद्म पुरस्कारांच्या यादीत समावेश करावा, असा प्रस्ताव अलीकडेच सांस्कृतिक मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.
संगीत, तबला आदी क्षेत्रासाठी पद्म पुरस्कार प्रदान केले जातात, मग पाककलेचा त्यामध्ये समावेश का करण्यात आलेला नाही, असे या प्रस्तावात म्हटले असून, आम्ही त्याचा अभ्यास करून तो शिफारशीसह गृहमंत्रालयाकडे पाठविला असल्याचे सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.काही महिन्यांपूर्वी शर्मा एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला हजर राहिले होते, तेथे त्यांना ही कल्पना सुचली. बल्लवाचार्य संजीव कपूर यांच्यासह अनेक नामवंत स्वयंपाकी या कार्यक्रमाला हजर होते. भारतीय पदार्थ आणि मसाले जगात लोकप्रिय आहेत. त्यामुळे स्वयंपाकाच्या कलेचा समावेश पद्म पुरस्कारांच्या यादीत झाला पाहिजे, त्यामुळे या क्षेत्रातही व्यवसायाच्या संधी वाढतील, असे शर्मा या वेळी म्हणाले. त्यानंतर काही बल्लवाचार्यानी त्यांच्याकडे प्रस्ताव पाठविला