काश्मीरच्या उत्तरेकडील कुपवाडा जिल्ह्य़ातील हंडवारामध्ये निर्माण झालेला तणाव आता निवळण्याची शक्यता आहे. लष्करातील एका जवानाने एका तरुणीचा विनयभंग केल्याच्या अफवेमुळे या भागातील स्थानिक आक्रमक झाले होते. मात्र, आज या तरूणीने आपल्यासोबत लष्कराच्या जवानाने कोणतेही गैरवर्तन केले नसल्याचे सांगितले. मात्र, काही स्थानिक तरूण जाणुनबुजून वाद निर्माण करत असल्याचा आरोप या तरूणीने केला. सैन्याकडून या तरूणीच्या जबाबाची ध्वनिचत्रफीत प्रसिद्ध करण्यात आली आहे.  या तरूणीने जबाबात म्हटल्याप्रमाणे ती एका मैत्रिणीबरोबर स्वच्छतागृहात गेली होती. स्वच्छतागृहातून बाहेर आल्यानंतर अचानकपणे एक तरूण माझ्यासमोर आला आणि त्याने माझी बॅग पळवली. यानंतर तो मला पोलीस स्टेशनमध्ये जाण्यापासून रोखत होता. यादरम्यान, त्याठिकाणी असणाऱ्या अन्य तरूणांनी चिथावणीखोर घोषणा देण्यास सुरूवात केल्याचे तरूणीने म्हटले आहे.
दरम्यान, हंडेवारातील परिस्थिती चुकीच्या पद्धतीने हाताळल्याप्रकरणी एका कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. हंडवारामध्ये निदर्शनादरम्यान लष्कराने केलेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले होते, तर १२ जण जखमी झाले होते. या घटनेमुळे या भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली होती. यानंतर लष्कर आणि पोलीस दलाने घटलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तर मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन दिले होते.

Story img Loader