संसदेवरील हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार मोहम्मद अफजल गुरू याला गेल्या ९ फेब्रुवारी रोजी फासावर चढवण्यात आल्यानंतर काश्मीर खोऱ्यात लादण्यात आलेली संचारबंदी शनिवारी उठवण्यात आली. याचबरोबर मोबाइल इंटरनेट सेवाही बहाल करण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
काश्मीर खोऱ्यातील दहाही जिल्ह्य़ांत गेल्या शनिवारी अफजल गुरूला फाशी देण्यात आल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती. ती उठवण्यात आल्याचे पोलीस प्रवक्त्याने म्हटले आहे. मात्र हुर्रियत कॉन्फरन्सचा नेता सय्यद अली शाह गिलानी यांनी शुक्रवारी केलेल्या बंदच्या आवाहनामुळे शनिवारी येथील जनजीवन ठप्पच होते. अफजल गुरूला देण्यात आलेल्या फाशीच्या निषेधार्थ तसेच त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या हवाली करण्यासाठी ‘काश्मीर बंद’चे आवाहन करण्यात आले होते.
गिलानी यांनी पुकारलेल्या बंदमुळे येथील दुकाने, व्यापारी संकुले शनिवारी बंदच होती. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही पूर्णत: ठप्प होती. श्रीनगर आणि खोऱ्यातील मोठय़ा शहरांत काही ठिकाणी खासगी गाडय़ा तुरळक स्वरूपात दिसत होत्या.
सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेली मोबाइल इंटरनेट सेवा आठवडय़ाभरानंतर पुनश्च सुरू करण्यात आल्यामुळे खोऱ्यातील सुमारे पाच लाख ग्राहकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. अफजल गुरूच्या फाशीनंतर काही संघटनांकडून या सेवेचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही सेवा बंद करण्यात आली होती.
नवी दिल्लीतील तिहार कारागृहात अफजल गुरूला गेल्या शनिवारी फासावर चढवण्यात आले. त्यानंतर खोऱ्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र शनिवारी ही बंदी उठवण्यात आल्यानंतर खोऱ्यात सर्वत्र शांतता होती. कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.गुरूला फाशी दिल्यानंतर गेल्या आठवडाभरात सुरक्षा दले व पोलिसांची खोऱ्यात काही ठिकाणी या घटनेचा निषेध करणाऱ्यांशी चकमक उडाली. यात तीन जण ठार, तर २५ पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण ६० जण जखमी झाले होते.

Story img Loader