नासाच्या क्युरिऑसिटी या रोव्हरने मंगळावर खोदकाम करून तेथील खडकांचे नमुने गोळा करण्यास सुरुवात केली आहे. मंगळावर पाणी होते किंवा नाही याचे पुरावे त्यातून मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या यंत्रमानवाने मंगळावरील भूमीत खोदकाम करून नमुने गोळा करण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे नासाने म्हटले आहे. क्युरिऑसिटीने पृथ्वीकडे जी छायाचित्रे पाठवली आहेत त्यात गाळापासून बनलेल्या खडकात ०.६३ इंच रुंद व २.५ इंच खोल असे छिद्र पाडण्यात आल्याचे दिसत आहे. या खडकात मंगळावरील पाण्याचे पुरावे मिळू शकतात. या नमुन्यांचे विश्लेषण करण्यासाठी या क्युरिऑसिटी रोव्हरमधील स्वयंचलित प्रयोगशाळेचा वापर केला जाणार आहे. नासाचे सहायक प्रशासक जॉन ग्रन्सफेल्ड यांनी सांगितले, की क्युरिऑसिटी प्रकल्पातील संशोधकांचे हे मोठे यश आहे. यापुढील काळात क्युरिऑसिटीला पृथ्वीवरील नियंत्रण कक्षातून सूचना दिल्या जातील व त्यांचे पालन करून या खडकांच्या नमुन्यांचे विश्लेषण केले जाणार आहे.
नासातील खोदकाम अभियंता अॅव्ही ओकॉन यांनी सांगितले, की मंगळावरील खडकात अतिशय खोल छिद्र पाडण्यात यश आले आहे. आमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पुरेसे नमुने आम्हाला मिळाले आहेत. खडकांची धूळ उडाल्यानंतर ती नमुना तपासणी विभागाकडे पाठवेपर्यंत जपून ठेवण्याची व्यवस्था त्यात आहे. आता जिथे छिद्र पाडले आहे तिथे तसे करण्यापूर्वी पृथ्वीवर या खोदकाम यंत्राची चाचणी घेतली होती, त्यात पृथ्वीवर वीस प्रकारच्या खडकात किमान बाराशे छिद्रे पाडून पाहिली होती असे जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीचे लुईस जानडय़ुरा यांनी सांगितले.
नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हरने सुरू केले मंगळावर खोदकाम
नासाच्या क्युरिऑसिटी या रोव्हरने मंगळावर खोदकाम करून तेथील खडकांचे नमुने गोळा करण्यास सुरुवात केली आहे. मंगळावर पाणी होते किंवा नाही याचे पुरावे त्यातून मिळण्याची शक्यता आहे.
First published on: 11-02-2013 at 03:54 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity rover of nasa started diggingon on mars