देशातील सर्वात मोठ्या हेरॉईन ड्रग्ज तस्करीपैकी एक असलेल्या गुजरातच्या मुंद्रा बंदरावरील (Mundra Port) तस्करीप्रकरणी कारवाईला वेग आलाय. जवळपास २१,००० कोटी रुपयांच्या ३,००० किलोग्रॅम हेरॉईन तस्करीप्रकरणी भूज न्यायालयाने चेन्नईतून अटक केलेल्या एका आरोपी जोडप्याला १० दिवसांची कोठडी सुनावली आहे. आतापर्यंत महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) दिल्लीत मंगळवारी (२१ सप्टेंबर) वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण ६ आरोपींना अटक केलीय. यात काही अफगाणिस्तानच्या नागरिकांचाही समावेश आहे. त्यांना दिल्लीत कोकेन आणि हेरॉईनसोबत अटक करण्यात आली होती. त्यांचा गुजरातमधील ड्रग्ज प्रकरणाशी संबंध आहे का हेही तपासलं जात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय (Custody to Chennai couple in 3000 Kg heroin drugs smuggling case Mundra port Gujrat).
कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरावर १६ सप्टेंबर रोजी सापडलेली ही ३,००० किलोग्रॅम ड्रग्जची खेप मुळात अफगाणिस्तानातून इराणमार्गे भारतात पाठवल्याची माहिती समोर येतेय. इराणच्या बंदर अब्बास पोर्टवरुन २ कंटेनर भारतात पाठवण्यात आले. कागदोपत्री या कंटेनरमध्ये सेमी प्रोसेस्ड टाल्क स्टोन्स (Semi processed talk stones) असल्याचं भासवत ही मोठी ड्रग्ज तस्करी करण्यात आली. मात्र, महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी करत या तस्करीवर कारवाई केली.
या कारवाईनंतर गुजरातमधील अहमदाबाद, गांधीधाम आणि मांडवी भागातही छापेमारीची कारवाई केली जात आहे. दिल्ली आणि चेन्नईतही या प्रकरणा कारवाई होत आहे. या अमली पदार्थांच्या तस्करीत अफगाणिस्तानी नागरिकांचा समावेश असल्याचाही अंदाज आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “जहाजांमधील या कंटेनरमध्ये प्रक्रिया केलेले टाल्क स्टोन असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच ही खेप चेन्नईतील जोडप्याकडून चालवण्यात येणाऱ्या आषी ट्रेडिंग कंपनीसाठी असल्याची नोंद होती. या कंपनीची नोंदणी मजवरम सुधाकर आणि वैशाली गोविंदराजू दुर्गा पूर्णा यांच्या नावे आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे होती.”
नेमकं प्रकरण काय?
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात मुंद्रा बंदरावर १६ सप्टेंबर रोजी महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या छापेमारीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले. दोन वेगवेगळ्या कंटेनरमध्ये प्रक्रिया केलेल्या टाल्क स्टोनच्या आवरणाखाली तब्बल २,९८८.२१९ किलोग्रॅम हेरॉईन ड्रग्ज सापडलं. अमली पदार्थांची तस्करी करणारी ही जहाजं अफगाणिस्तानमधून इराणमार्गे भारतात पाठवण्यात आली होती. यानंतर गुजरातमध्ये ठिकाठिकाणी छापेमारी करत कारवाई सुरू आहे.
टाल्क स्टोनच्या आवरणाखाली तीन स्तर करुन हेरॉईन लपवले
विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय डग्ज तस्करी करणाऱ्या या आरोपींनी कागदोपत्री टाल्क स्टोनची वाहतूक करत असल्याचा बनाव केला. मात्र, वास्तवात कंटेनरमधील टाल्क स्टोनचे ३ आवरणं करुन त्याखाली हेरॉईन ड्रग्ज लपवण्यात आलं होतं.
ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल होणार
आंतरराष्ट्रीय पातळीवर काळ्या पैशांच्या व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याचं सांगत ईडीने या प्रकरणी लवकरच मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिलीय.
अदानी उद्योग समुहाकडून स्पष्टीकरण
अदानी उद्योग समुहाची मालकी असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा सापडल्यानं खळबळ उडालीय. यानंतर अदानी समुहाने स्पष्टीकरण दिलंय. “बंदर चालवणाऱ्या कंपनीची भूमिका केवळ बंदरावरील वाहतुकीचं नियोजन करण्याची आहे. आम्ही केवळ जहाजांना बंदरावरील सेवा देतो. मुंद्रा बंदरावरुन वाहतूक होणाऱ्या कंटेनर आणि कार्गो जहाजांची तपासणी करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत.”
Custody to Chennai couple in 3000 Kg heroin drugs smuggling case Mundra port Gujrat