राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळाप्रकरणी दिल्ली न्यायालयात गुरुवारी स्पर्धेच्या संयोजन समितीचे प्रमुख सुरेश कलमाडी यांच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यात येणार आहेत. फसवणूक, कट रचणे आणि अधिकाराचा गैरवापर करून तिजोरीवर ९० कोटी रुपयांचा भार टाकणे याबाबत आरोप निश्चित करण्यात येणार आहेत.विशेष सीबीआय न्यायाधीश रवींदर कौर यांच्या न्यायालयात हे आरोप निश्चित करण्यात येणार असून कलमाडी, ललित भानोत यांच्यासह अन्य नऊ जणांविरुद्ध आरोप निश्चित केले जाणार आहेत. न्यायालयाने गेल्या २१ डिसेंबर रोजी आरोप निश्चित करण्याबाबत आदेश दिले होते आणि त्यासाठी गुरुवार १० जानेवारी ही तारीख मुक्रर केली होती. कलमाडी आणि भानोत यांच्यासह जन. व्ही. के. वर्मा, सुरजित लाल, एएसव्ही प्रसाद, एम. जयचंद्रन हे या खटल्यातील आरोपी आहेत.