Cyber attack on IAF aircraft in Myanmar : भारताच्या शेजारील देश म्यानमार भूकंपाने हादरला आहे. या भूकंपामुळे हजारो लोक मृत्यूमुखी पडले असून अब्जावधी रुपयांची वित्तहानी झाली आहे. शेकडो घरं, इमारती कोसळल्या असून, हजारो लोक बेघर झाले आहेत. भूकंपग्रस्त भागात अन्नधान्याचा व वैद्यकीय सेवेचा तुटवडा आहे. त्यामुळे जगभरातून म्यानमारकडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे. भारतानेही मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान, भारतातून म्यानमारला मदत सामग्री घेऊन जाणाऱ्या विमानावर सायबर हल्ला झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

भारताच्या संरक्षण दलातील सूत्रांनी इंडिया टूडेला सांगितलं की भारतीय हवाई दलाचं विमान सी-१३० मदत सामग्री घेऊन म्यानमारला जात होतं. त्याचवेळी या विमानावर जीपीएस स्पूफिंग हल्ला झाला. हल्लेखोरांनी या विमानाची नेव्हिगेशन प्रणाली हॅक करण्याचा (स्वतःच्या नियंत्रणात घेण्याचा किंवा विस्कळीत करण्याचा) प्रयत्न केला. हल्ल्याची जाणीव होताच त्या विमानाच्या वैमानिकाने ताबडतोब अंतर्गत नेव्हिगेशन प्रणालीवर स्विच केलं. वैमानिकाच्या शहाणपणामुळे मोठी दुर्घटना टळली.

म्यानमारला मदत करण्यासाठी भारताचं ऑपरेशन ब्रह्मा

गेल्या महिन्यात, २८ मार्च रोजी म्यानमारमध्ये ७.७ रिष्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. यामध्ये ३ हजार ३४९ लोकांचा बळी गेला. तसेच या नैसर्गिक आपत्तीत ५ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. भारताच्या शेजारील देशात प्रचंड मोठा विध्वंस झाला आहे. त्यामुळे म्यानमारला मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा हाती घेतलं आहे. याद्वारे भारत म्यानमारला सर्च ऑपरोशन (शोधमोहीम), मानवतावादी मदत, आपत्ती निवारण आणि वैद्यकीय सेवा यांसारखी मदत पाठवत आहे. भारतीय हवाई दलाची विमानं ही मदत सामग्री घेऊन म्यानमारला पाठवली जात आहेत. अशाच एका विमानावर रविवारी सायबर हल्ला झाला.

म्यानमारमध्ये नेमकं काय घडलं?

संरक्षण विभागातील सूत्रांनी सांगितलं की भारतीय हवाई दलाच्या विमानाने म्यानमारच्या हद्दीत प्रवेश करताच पायलटला संशय आला की विमानातील नेव्हिगेशन प्रणाली चुकीचा मार्ग दाखवत आहे. या प्रणालीवर सायबर हल्ला झाला असावा असा वैमानिकाला संशय आला. यालाच जीपीएस स्पूफिंग म्हणतात. विमानाची दिशा बदलतेय हे देखील त्याच्या लक्षात आलं. अशावेळी बॅकअप नेव्हिगेशन प्रणालीचा वापर केला जातो. वैमानिकाने ताबडतोब विमान या प्रणालीवर स्विच केलं.

या प्रणालीमुळे वैमानिक बाहेरच्या सिग्नलवर अवलंबून नसतो. त्यामुळे विमान भरकटण्याची शक्यता कमी असते. या बॅकअप प्रणालीच्या मदतीने वैमानिकाने विमान योग्य ठिकाणी नेलं आणि सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवलं. तसेच भारताने पाठवलेली मदत सामग्री तिथल्या प्रशासनाच्या ताब्यात दिली.