Scammer Calls Real Cop: भारतात सायबर क्राइमचे प्रमाण खूप वाढले आहे. गेल्या काही वर्षात विविध प्रकारच्या गुन्ह्यात वाढ झाली असून सायबर चोरट्यांनी कोट्यवधी रुपयांची लूट केली आहे. लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर चोरट्यांकडून विविध प्रकारच्य क्लुप्त्या योजल्या जातात. डिजिटल अरेस्ट, घोटाळ्यात अडकल्याची भीती दाखवून अनेकांची फसवणूक केलेली आहे. असाच एक प्रकार केरळमध्ये घडला आहे. मात्र या प्रकरणात सायबर चोरटाच फसला. स्वतः पोलीस अधिकारी असल्याचे भासवून चोरट्याने ज्याला फोन लावला, तो व्यक्तीच पोलीस निघाला आणि चोरट्याला समजेपर्यंत पोलिसांनी त्याचे लोकेशनही मिळवले. केरळच्या त्रिशूर शहर पोलिसांनी या घटनेचा लाईव्ह व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून त्याला मिमचे स्वरुप दिले आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सायबर चोरटा पोलिसांचा गणवेश घालून बसलेला दिसत आहे. तो स्वतःला मुंबई पोलिसांचा अधिकारी असल्याचे भासवतो. त्याने ज्यांना फोन केला, ते स्वतः पोलीस अधिकारी असल्यामुळे त्यांनी चोरट्याला याची जराही कल्पना न देता त्याल बोलण्यात गुंतवून ठेवले. माझा कॅमेरा व्यवस्थित चालत नाही, असे सांगून खऱ्या पोलिसांनी स्वतःचा कॅमेरा बंद ठेवला होता. तेवढ्या वेळात त्यांनी सायबर सेलद्वारे चोरट्याचे लोकेशन मिळविले. त्यानंतर स्वतःचा कॅमेरा चालू करून चोरट्याला तू कसा आहेस? असे विचारले.

आपल्या समोर खराखुरा पोलीस अधिकारी पाहून सायबर चोरट्याची भंबेरी उडते. तो निशब्द होऊन फक्त पाहत राहतो. आपण फार मोठी चूक केल्याचे त्याच्या लक्षात येते. त्यानंतर पोलीस अधिकारी त्याला सांगतात, “तुझे लोकेशन आता आम्हाला मिळाले आहे. तू हे सर्व काम बंद कर. तुझा पत्ता आणि इतर माहिती आता आमच्याकडे आहे. हे सायबर सेल आहे. त्यामुळे इथून पुढे हे धंदे बंद कर.”

त्रिशूर पोलिसांनी मंगळवारी हा व्हिडीओ शेअर केला. तेव्हापासून या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले आहेत त्रिशूर पोलिसांचे यानिमित्ताने कौतुक होत आहे. त्यांनी या घटनेचे चित्रीकरण करून मीम स्वरुपात संपूर्ण प्रकरण सादर केल्यामुळे सोशल मीडियावर सायबर चोरीप्रकरणी जनजागृती होत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyber scammer pretending to be mumbai police officer calls real police and this happens next kvg