लॉकडाउनमुळे हाताला काम नसल्याने पायीच चालत गावी निघालेल्या लाखो स्थलांतरित मजुरांचे हाल होत आहेत. कालच औरंगाबादमध्ये १६ मजुरांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. तशाच प्रकारची मन हेलावून टाकणारी घटना दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या लखनऊ शहरात घडली. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.
एक जोडपे सायकलवरुन गावी जाण्यासाठी निघाले होते. सोबत त्यांची दोन मुले सुद्धा होती. लखनऊ ते छत्तीसगडचा बीमीत्रा जिल्हा हा ७५० किलोमीटरचा प्रवास ते सायकलवरुनच करणार होते. लखनऊच्या सिकंदरा गावात राहणारा कृष्णा साहू (४५) पत्नी प्रमिला (३८) आणि दोन मुलांना घेऊन सायकलवरुन निघाला.
कृष्णा घरापासून सायकल चालवत २५ किलोमीटर अंतरापर्यंत आल्यानंतर दुपारी २.३० च्या सुमारास एका वाहनाने त्यांच्या सायकलला धडक दिली. यामध्ये प्रमिलाचा जागीच मृत्यू झाला. पोलीस कृष्णाला किंग जॉर्ज मेडिकल रुग्णालयात घेऊन गेले. तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुदैवाने त्याची दोन्ही मुले या भीषण अपघातातून बचावली. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
ही दोन्ही मुले आता आपल्या काकांकडे आहेत. कृष्णाचा भाऊ राम कुमार लखनऊनमध्येच राहतो. कृष्णा बांधकाम मजूर होता. “गावी निघण्याआधी मला माझ्या भावाने काहीच सांगितले नाही. बांधकाम साईट बंद झाल्यामुळे कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला होता. आठवडयाभरापूर्वी मी त्याच्याबरोबर बोललो. त्यावेळी पैसे नसल्याचे तो बोलला होता” असे राम कुमारने सांगितले.