देशामध्ये करोनाग्रस्तांचा आकडा दिवसोंदिवस वाढत असून करोनाचे संकट समोर असतानाच आता देशातील काही राज्यांवर आस्मानी संकट कोसळण्याची चिन्हं दिसत आहेत. पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील काही दिवसांमध्ये भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांच्या किनारी भागाला अम्फान (Amphan) चक्रीवादळाचा फटका बसू शकतो असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. देशातील आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या वादाळाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शनिवारी (१६ मे २०२०) अंदमान-निकोबारसहीत लक्षद्वीपमध्ये चक्रवादळासहीत जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. याचबरोबर ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील काही भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तयार झालेल्या अम्फान चक्रवादळाचा सर्वाधिक फटका पूर्वेकडी राज्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी दक्षिण, पश्चिम आणि उत्तरेकडील काही भागांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. काही भागामध्ये धुळीची वादळेही उठतील असं अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नक्की वाचा >> चक्रीवादळं म्हणजे का?, चक्रीवादळांचा इशारा कधी दिला जातो?, त्यांना नावं कशी दिली जातात?

अम्फान चक्रीवादळामुळे ताशी ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच मासेमारी करण्यासाठी मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये तसेच जे समुद्रामध्ये गेले आहेत अशा मच्छीमारांनी तातडीने परत यावे असा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाचा थेट तडाखा बसणार नसला तरी केरळमध्ये रविवारी (१७ मे) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहावे, असा सावधगिरीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तामिळनाडू, कर्नाटक राज्यामध्येही अम्फानमुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आंध्र प्रदेशच्या किनारी भागामध्येही पुढील दोन ते तीन दिवस जोरदार ते मध्य स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी दिल्लीमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यांसहीत जोरदार पाऊस पडला. तसेच दिल्लीमध्ये काही ठिकाणी गाराही पडल्याने दिल्लीतील वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या देशाच्या उत्तरेकडील भागामधील वातावरणामध्ये मोठा बदल दिसून येत आहे. त्यामुळेच डोंगराळ भाग असणाऱ्या जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश बरोबरच पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेशमध्येही वातारवणातील बदल जाणवेल असं सांगितलं जात आहे. या राज्यांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून लोकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अंदमान-निकोबारसहीत लक्षद्वीपमध्ये आजपासून (शुक्रवार, १५ मे २०२०) पुढील काही दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तर ओडिशाच्या किनारपट्टी भागात मंगळवारी आणि पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये पुढील आठवड्यात बुधवारी ( २० मे २०२०) जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर पुढच्या शुक्रवारी आणि शनिवारी म्हणजेच २२ आणि २३ मे रोजी दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये धुळीची वादळे आणि काही प्रमाणात पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Story img Loader