Cyclone Biparjoy Gujarat Updates : गेल्या दहा दिवसांपासून अरबी समुद्रात घोंगावणारे बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी (१५ जून) सायंकाळी साडेसहा दरम्यान गुजरातच्या किनाऱ्यावर धडकले. यामुळे गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस झाला. तसंच, गुजरातच्या अनेक भागात सोसाट्याचा वारा सुटला होता. परिणामी येथे मोठ्याप्रमाणात वित्तहानी झाली आहे.
११५-१२५ किमी प्रतितास वाऱ्याच्या वेगाने चक्रीवादळाने गुजरातमध्ये प्रवेश केला. यामुळे वृक्ष कोलमडून पडली, विजेचे खांब कोसळले. परिणामी गुजरातच्या अनेक गावात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. रस्त्यांवर झाडे कोसळल्याने मार्गांवर अडथळे निर्माण झाले आहेत. जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रशासन कार्यरत झाले आहे.
मोदींनी केला मुख्यंमत्र्यांना फोन
दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला होता. सरकारी निवेदनातून त्यांनी गिर जंगलातील सिंह आणि अन्य वन्य प्राण्यांबद्दल चिंताही व्यक्त केली. दरम्यान, बाधितांना रोख रक्कम, घरगुती वस्तू, निवारा पोहोचवण्याचे आदेश भूपेंद्र पटेल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
हेही वाचा >> Biparjoy Cyclone : गुजरात किनाऱ्यावर धडकलं बिपरजॉय चक्रीवादळ, ताशी १३० किमी वेगाने सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस
मृतांची संख्या सहा
भावनगर शहराजवळील पुराच्या प्रवाहात एक मेंढपाळ त्याच्या मुलासह वाहून गेल्याने दोघांचाही मृत्यू झाला आहे. राम परमार (55) आणि राजेश (22) हे पुराच्या पाण्यात वाहून गेले. या घटनेत त्यांच्या १० मेंढ्यांचाही मृत्यू झाला आहे. यामुळे सोमवारपासून चक्रीवादळातील मृतांची संख्या सहा झाली आहे.
वादळाची तीव्रता कमी होणार, पण..
गुरुवारी रात्री १०.३० वाजता चक्रीवादळाचा व्यास ५० किमी होता. हे वादळ गुजरातच्या जाखाऊ बंदरापासून अवघ्या २० किमी अंतरावर होते. तर १०-१२ किमी प्रतितास वेगाने हे वादळ पुढे जात होते. दरम्यान, अतितीव्र झालेले या वादळाचे तीव्र वादळात रुपांतर झाले आहे. तर, आज या वादळाची तीव्रता आणखी कमी होण्याची शक्यता आहे. परंतु, तरीही या वादळाचा परिणाम पुढील दोन ते तीन दिवस कायम राहील अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
आता राजस्थानच्या दिशेने
गुजरातला धडकल्यानतंर हे वादळ आता राजस्थानच्या दिशेने गेले असल्याचेही हवामान खात्याने सांगितले. परिणामी, गुजरात, राजस्थानमध्ये शनिवारी मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. दिल्ली, हरियाणातही वादळाचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.
उत्तर गुजरातमधील बनासकांठा आणि पाटणसारख्या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग हळूहळू कमी होईल. शुक्रवारी सायंकाळपर्यंत स्थिती सामान्य होईल, असाही अंदाज आयएमडीचे प्रादेशिक संचालक मनोरमा मोहंती यांनी वर्तवला आहे.
गुजरातच्या अनेक जिल्ह्यांमध्ये बुधवारपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसामुळे द्वारका आणि जामनगर जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित झाला आहे. पोरबंदरमध्ये, वेरावळला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ५१ वर अनेक झाडे उन्मळून पडल्याने महामार्ग ब्लॉक झाला आहे.
द्वारकामध्ये, अधिकाऱ्यांनी सांगितले की, “बुधवारपासून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ३५० हून अधिक विजेचे खांब पडले आहेत. पश्चिम गुजरात विज कॉर्पोरेशन लिमिटेड (PGVCL) ने वीज त्वरीत पुनर्संचयित करण्यासाठी अधिकारी आणि अभियंत्यांना जिल्ह्यात पाठवले आहे.