Cyclone Biparjoy Gujarat Updates : बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरात राज्याची वाताहात झाली आहे. सर्वाधिक काळ अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या या चक्रीवादळामुळे गुजरातचे अतोनात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वादळाचा तडाखा म्हणून राज्यात अतिमुसळधार पाऊस झाला होता. यामुळे गुरुवारी भावनगर जिल्ह्यात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. पूरामुळे पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या शेळ्यांना वाचवताना बाप-मुलाचा करूण अंत झाला आहे.
गुरुवारी सायंकाळी बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकले. मात्र, सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे सिहोर शहराजवळील भंडार गावात पाण्याचा प्रवाह निर्माण झाला होता, असे महसूल अधिकारी एसएन वाला यांनी सांगितले.
भावनगरमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने नदी नाले भरून वाहत होते. अचानक आलेल्या पुरामुळे शेळ्यांचा कळप या पाण्याच्या प्रवाहात अडकला. जनावरांना वाचवण्यासाठी ५५ वर्षीय रामजी परमार आणि त्यांचा मुलगा राकेश परमार (२२) हे प्रयत्न करत होते. मात्र, या प्रयत्नात हे बाप-लेक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यानंतर, त्यांचा मृतदेह काही अंतरावर सापडला, अशी माहिती एसएन वाला यांनी दिली. या दुर्घटनेत १ मेंढी आणि २२ शेळ्या मरण पावले आहेत.
राज्यात चक्रीवादळ संबंधित कोणत्याही मृत्यूची नोंद झाली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वांत जास्त प्रभावित असलेल्या कच्छ जिल्ह्यात जीवितहानीचे वृत्त नाही, असे जिल्हाधिकारी अमित अरोरा यांनी सांगितले. “आम्ही अगोदरच केलेल्या मोठ्या प्रमाणात स्थलांतरामुळे चक्रीवादळाशी संबंधित कोणत्याही घटनेमुळे कच्छमध्ये जीवितहानी झालेली नाही. सुमारे ८० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे काही झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले आहेत”, असे ते म्हणाले.