भुवनेश्वर :

बंगालच्या खाडीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) व्यक्त केली आहे. या चक्रीवादळाचा परिणाम ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला जाणवेल असेही हवामान खात्याने म्हटले आहे. पुढील २४ तासांत अंदमान समुद्रावरील हवेच्या चक्रीवादळाचे बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होण्याची शक्यता आहे.

विशेष बुलेटिनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हवामान प्रणाली पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची तसेच २२ ऑक्टोबर सकाळपर्यंत तीव्र होण्याची, तर २३ ऑक्टोबरपर्यंत पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान प्रणाली पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने सरकून २२ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत गती तीव्र होईल आणि २३ ऑक्टोबरपर्यंत पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होईल. त्यानंतर, ते उत्तर पश्चिम दिशेने सरकून २४ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत ओडिशा-पश्चिम बंगाल किनारपट्टीपासून वायव्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा >>> महाविकास आघाडीतील वाद विकोपाला; विदर्भातील १२ जागांवर तडजोडीस काँग्रेस ठाकरे गटाचा नकार

मुसळधार पावसाची शक्यता

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे २३ ते २५ ऑक्टोबरदरम्यान ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मच्छिमारांना २१ ऑक्टोबरपर्यंत किनारपट्टीवर परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. २३ ऑक्टोबरपासून ओडिशाच्या काही भागांत मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता असल्याची माहिती आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिली. किनारपट्टीवरील काही भागांत २४-२५ ऑक्टोबरला २० सें.मी. तर काही ठिकाणी ३० सें.मी. पाऊस, तर काही ठिकाणी ३० से.मी.पेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्याचे ते म्हणाले. यामुळे पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

ताशी ६० कि.मी. वाऱ्यांचा वेग

२३ ऑक्टोबरच्या सायंकाळपासून ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर ताशी ४०-५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून तो ताशी ६० किमीपर्यंत पोहोचू शकतो. २४ ऑक्टोबरच्या रात्रीपासून ते २५ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत, ते हळूहळू १००-११० किमी प्रतितासपर्यंत वाढू शकते आणि १२० किमी प्रतितासपर्यंत पोहोचू शकते, असे आयएमडीने म्हटले आहे.