दाना चक्रीवादळ आणि त्यामुळे आलेल्या मुसळधार पावसामुळे ओडिशातील १.७५ लाख एकर जमिनीवरील उभ्या पिकांचे नुकसान झाल्याचे, तसेच २.८० लाख एकर जमिनीवरील पिके बुडिताखाली गेल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे कृषी आणि शेतकरी सक्षमीकरण विभागाचे प्रधान सचिव अरबिंदा पाधी यांनी शनिवारी आपल्या एक्स संदेशात म्हटले आहे. तसेच राज्य सरकारने कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना चक्रीवादळामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिल्याची माहिती त्यांनी दिली. अहवालाअंती सरकार शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा निर्णय घेईल असे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सांगितले.

हेही वाचा : Pregnant teen murder: गर्भवती प्रेयसीचा लग्नासाठी तगादा; प्रियकरानं करवा चौथचा उपवास ठेवायला सांगितला आणि नंतर खड्डा खणून…

बालासोर जिल्ह्यात सर्वाधिक फटका

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग खैरा, सिमुलिया, बहनगा, सोरो, औपाडा आणि निलागिरी या भागांना त्याचा सर्वाधिक फटका बसल्याचे जिल्हाधिकारी सूर्यबंसी मयूर विकास यांनी सांगितले. येथील सुमारे ४० हजार घरांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. राज्याचे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारी यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे.