Cyclone Fengal IMD Alert : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल या चक्रीवादळामुळे उत्तर तमिळनाडूमधील चेन्नई आणि इतर अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान चक्रीवादळाचा जमिनीकडे येण्याचा वेग काही प्रमाणात कमी झाला आहे. आज (३० नोव्हेंबर) संध्याकाळपर्यंत हे चक्रीवादळ किनारपट्टी भागात धडकेल असा अंदाज वर्तवला जात होता. पण सध्या हे चक्रीवादळ रात्रीपर्यंत किनारपट्टीजवळ पोहचेल असे सांगितले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू आणि पद्दुचेरीमध्ये मुसळधार पाऊस आणि जोराच्या वाऱ्यामुळे जन जीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ रात्रीच्या सुमारास पुद्दुचेरीजवळ धडकेल आणि यावेळी वाऱ्याचा वेग ९० किमी प्रतितास असेल असे सांगण्यात आले आहे. चक्रीवादळाच्या हालचालीस होत असलेला उशीर, कमी झालेला वेग आणि ते गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरावर घोंघावत असल्याने तामिळनाडू आणि पद्दुचेरीमध्ये प्रचंड पाऊस होत असल्याचे सांगितले जात आहे.

शनिवारी सकाळी चेन्नई आणि परिसरातील जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची नोंद झाली आणि याचा परिणाम म्हणून सखल भागात पाणी भरल्याचे पाहायला मिळाले. हवामान केंद्रांवर गोळा झालेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार उत्तर चेन्नईमधील काथिवाक्कममध्ये सर्वाधिक १२ सेमी पावसाची नोंद झाली, तर शहराच्या इतर भागांमध्ये सरासरी ६ ते ९ सेमी पावसाची नोंद झाली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार फेंगल चक्रीवादळ हे शनिवारी सकाळी साडे आठ वाजता चेन्नईच्या अंदाजे ११० किमी अग्नेय आणि पद्दुचेरीच्या १२० किमी पूर्व-इशान्येस होते. दरम्यान दक्षिणेकडे सरकत असलेले हे चक्रीवादळ आज रात्री रात्री कराईकल आणि ममल्लापुरमच्या दरम्यानचा समुद्र किनारा ओलांडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा>> Cyclone Fengal Video: चक्रीवादळ ‘फेंगल’ किनारपट्टीवर कधी-कुठे धडकणार, याचे नाव कोणी ठेवले? वाचा सविस्तर

जमीनीकडे येण्यास लागलेल्या उशीरामुळे सातत्याने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ जमीनीवर धडकल्यानंतर देखील पाऊस सुरूच राहाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान चेन्नई, तिरुवल्लूर, चेंगलपट्टू, कांचीपुरम, विल्लुपुरम, कल्लाकुरिची आणि कुड्डालोर यासह पुद्दुचेरीसाठी देखील रेड अलर्ट कायम आहे. या भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच तमिळानाडूतील अंतर्गत भागांमधील रानीपेट, तिरुवन्नमलाई आणि नागापट्टिनमसह या जिल्ह्यांसाठीही हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, येथेदेखील तुलनेने कमी पण जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

चक्रवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. २,००० हून अधिक मदत शिबिरे उघडण्यात आली आहेत. तसेच सरकारी यंत्रणांच्या सल्ल्यानंतर ४,१०० हून अधिक मासेमारी नौका किनाऱ्यावर परतल्या आहेत. नागापट्टिनम आणि तिरुवरूर जिल्ह्यांमध्ये, असुरक्षित भागातील सुमारे ५०० लोकांना आश्रयस्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान चक्रीवादळामुळे परिसरातील वाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्या आहेत. चेन्नई विमानतळावर दुपारपासून ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyclone fengal update delayed landfall of cyclone intensifies rain red alert in chennai and northern tamil nadu rak