अमरावती : चक्रीवादळ ‘मिचौंग’ने मंगळवारी दुपारी साडेबारा ते अडीच वाजेच्या दरम्यान आंध्र प्रदेशची दक्षिण किनारपट्टी ओलांडली. यामुळे बापटला जिल्ह्याच्या परिसरात ताशी ९० ते १०० प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याचे अमरावती हवामान केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगितले. ही हवामान प्रणाली उत्तरेकडे सरकणार असून, चक्रीवादळ कमकुवत होण्याची शक्यता आहे. मात्र वेगवान वादळी वारे वाहतील.
हेही वाचा >>> तमिळनाडूत ‘मिचौंग’चे १२ बळी; चेन्नईत नौका-ट्रॅक्टरने मदत
प्रसिद्धीपत्रकात नमूद केले, की बंगालच्या उपसागरावरील पश्चिम-मध्य भागावरील हवामान प्रणाली आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागातील किनाऱ्याजवळून उत्तरेकडे सरकली. जमिनीवर धडकताना या चक्रीवादळाचे केंद्र दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर बापटलाजवळ होते. वादळ भूभागावर पोहोचण्याची प्रक्रिया सुमारे तीन तास चालली. मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती दिली, की चक्रीवादळ नेल्लोर आणि कावलीदरम्यान भूभागावर धडकले.
या चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीने राज्याच्या अनेक जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले. पूर, खराब झालेले रस्ते, ओसंडून वाहणारे कालवे, फुगलेले नाले आणि तलावासह या कृषीप्रधान राज्यातील हजारो एकर पिके पाण्याखाली बुडाली. मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी आढावा बैठक घेऊन मदतकार्याचा आढावा घेतला. दुसरीकडे, हे चक्रीवादळ ओडिशाकडे सरकण्याची भीती लक्षात घेऊन पटनाईक सरकारने खबरदारीची उपाययोजना केली आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तसेच ६ डिसेंबरला सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.