Cyclone Mocha : बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळाने तीव्र रुप धारण केलं आहे. हे चक्री वादळ आता उत्तर-ईशान्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या चक्री वादळामुळे १७५ किलोमीटर वेगाने वारा वाहणार असून मच्छिमार, जहाजे, बोटी आणि ट्रॉलर यांना मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागरांत आणि उत्तर अंदमान समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसंच, भारताच्या अनेक भागात पाऊस पडण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एनडीआरएफ सक्रिय झाले आहे.
मोचा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या आठ टीम पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. मोचा चक्री वादळ १२ मे रोजी तीव्र होईल आणि १४ मे रोजी अत्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतरित होईल. संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी ८ टीम तैनात केल्या आहेत. तर, एनडीआरएफचे २०० बचावकर्ते कार्यरत असून १०० बचावकर्ते राखीव ठेवण्यात आले आहेत.
भारतात पावसाची शक्यता
भारतात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रविवारी (१४ मे) नागालँड, मणिपूर आणि दक्षिण आसाममध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
काय असेल ‘मोचा’चा मार्ग?
हे चक्री वादळ भारताच्या दक्षिण किनारी भाग, ओडिशा आणि अग्नेय गंगा पश्चिम बंगालमधून जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, आता चक्री वादळाच्या क्षेत्राचे निरीक्षण केल्यानंतर ते बंगालच्या उपसागरातून पुढे सरकले असून ते उत्तर-ईशान्य बांगलादेश-म्यानमार किनारपट्टीकडे वळले असल्याची माहिती आहे.
चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर बंगालचा उपसागर, अंदमानचा समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे मच्छिमार जहाजे, बोटी, ट्रॉलर यांनी अग्नेय बंगालच्या उपसागरात १२ मेपर्यंत आणि मध्य बंगालच्या उपसागरात आणि उत्तर अंदमान समुद्रात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.