पायलिन चक्रीवादळानंतर ओदिशात झालेल्या मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बालासोर आणि जजपूर जिल्ह्य़ातील ७५ हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
गेले तीन दिवस या भागात संततधार आहे. सततच्या पावसाने मदतकार्यावर परिणाम झाला आहे. चक्रीवादळ आणि त्यानंतरची पूरस्थिती याचा फटका ओरिसातील एक कोटी वीस लाख लोकांना बसला आहे. १६ हजार खेडय़ांना याचा फटका बसला असून २६ बळी गेले आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी हवाई पाहणी केली. सुमारे ६ लाख २५ हजार हेक्टर पीक उद्ध्वस्त झाले असून जवळपास साडेतीन लाख घरांचे नुकसान झाले आहे.ओदिशामध्ये मदतकार्य सुरू
वादळ आणि महापूर यामुळे ओदिशातील १६ हजार गावांतील जवळपास १.२ कोटी जनता बाधित झाली असून आतापर्यंत २६ जण मृत्युमुखी पडले आहेत. बालासोर, जाजपूर, भद्रक आणि मयूरभंज या पूरग्रस्त जिल्ह्य़ांची मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी हवाई पाहणी केली. वादळ आणि महापूर या नैसर्गिक आपत्तींच्या पाश्र्वभूमीवर पटनाईक यांनी बुधवारी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे ठरविले आहे.
पाच जिल्ह्य़ांतील स्थिती अत्यंत गंभीर असून अद्यापि ७५ हजार लोक बालासोर आणि जाजपूर जिल्ह्य़ात अडकून पडले असल्याचे ओदिशाचे महसूलमंत्री एस. एन. पात्रो यांनी सांगितले. या जिल्ह्य़ातील सहा लाख २५ हजार ४०८ हेक्टर क्षेत्रावरील उभी पिकेही नष्ट झाली असून तीन लाख ३३ हजार ०७० घरांचे नुकसान झाले आहे.
नदीचे पाणी ओसरू लागले
वादळाच्या तडाख्यामुळे दरडी कोसळल्या असून त्यापूर्वीच ९.९ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, तर एक लाख १२ हजार २४१ जणांना पूरग्रस्त क्षेत्रातून बाहेर काढण्यात आले आहे, असेही पात्रो म्हणाले. बुधबलंग नदीतील पाणी बहानगा, औपाडा, सिमुलिया, नीलगिरी आणि सोरे या ठिकाणी ओसरू लागले असले तरी बस्ता, भोगराय, जलेश्वर आणि पालियापाल येथील पूरस्थिती अद्यापही गंभीर आहे.
राज्य सरकारच्या वतीने प्रत्येक कुटुंबाला ५० किलो तांदूळ आणि डाळ पुरविण्यात आली आहे. दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांना त्यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी प्रत्येकी ५०० रुपये देण्यात आले आहेत, असे गंजमचे जिल्हाधिकारी कृष्णकुमार यांनी सांगितले. प्रशासनाने २० बिगर सरकारी संस्थांवरही जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठय़ाची जबाबदारी सोपविली आहे. ग्रामीण आणि शहरी भागांतील जनतेला वीजपुरवठा आणि भ्रमणध्वनी यंत्रणेतील अडथळ्यांनाही तोंड द्यावे लागत असून येत्या एक-दोन दिवसांत ही यंत्रणा पूर्ववत होईल, असे सांगण्यात येत आहे.
मदत वेळेवर मिळाली नाही
वादळाचा तडाखा बसलेल्या गावातील जनतेला मदत वेळेवर न मिळाल्याने गेल्या दोन दिवसांपासून लहान मुले आणि वृद्ध उपाशी असल्याची तक्रार   केली जात आहे.
पश्चिम बंगाल, बिहारमध्येही पाऊस
पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्य़ात मुसळधार पाऊस कोसळत असून त्यामुळे जवळपास १० हजार जण बाधित झाले आहेत. या पावसामुळे दोन हजार घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून १५०० घरांचे काही प्रमाणात नुकसानही झाले आहे, असे जिल्हा दंडाधिकारी तन्मय चक्रवर्ती यांनी सांगितले. रविवारपासून जिल्ह्य़ात १६५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
वादळामुळे बिहारमध्येही मुसळधार पाऊस कोसळत असून भोजपूर, सिवान आणि पाटणा येथे पूरसदृश स्थिती आहे. मात्र मंगळवार सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी १२५.३ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत.
जपानला विफा वादळाचा तडाखा बसणार
टोकियो: भारतात पायलिन वादळ नुकते शमते तोच जपानला आता गेल्या दहा वर्षांतील सर्वात प्रलयंकारी असे विफा नावाचे वादळ तडाखा देणार आहे, ते फुकुशिमा अणुप्रकल्पाच्या ठिकाणीही त्याचा प्रभाव दाखवील असे सांगितले जाते. विफा या वादळाचा वेग ताशी २०० किलोमीटर असून, त्यामुळे दक्षिण पॅसिफिक भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. सध्या हे वादळ ताशी ३५ कि.मी. वेगाने मार्गक्रमण करीत असून ते उद्यापर्यंत राजधानी टोकियोपर्यंत धडक मारेल. गेल्या दहा वर्षांतील हे सर्वात मोठे वादळ असेल ते कांतो या टोकियोजवळच्या भागातून जाईल असे हवामान अंदाज देणारे अधिकारी हिरोयुकी उचिडा यांनी सांगितले. या वादळाचा वाहतुकीवर परिणाम होणार असून ऐन वर्दळीच्या काळात ते धडकणार आहे. फुकुशिमा प्रकल्पाच्या टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनीने वादळ व जोराच्या पावसाला तोंड देण्यास सज्ज असल्याचे सांगितले. याच महिन्यात पावसाचे पाणी टाक्यातून काढत असताना ४३० लीटर प्रदूषित पाणी समुद्रात मिसळले गेले होते. आता मात्र पुरेशी काळजी घेतली जाईल असे सांगण्यात आले.