हवामान खात्याचा अचूक अंदाज, आपत्ती व्यवस्थापनाची चोख कामगिरी आणि राज्य सरकारांची इच्छाशक्ती या त्रिसूत्रीच्या जोरावर पायलिन चक्रीवादळाला समर्थपणे तोंड देण्यात प्रशासन यशस्वी ठरले. पायलिनचा सर्वाधिक तडाखा मात्र ओडिशाला बसला. या नैसर्गिक आपत्तीत २३ जणांचा मृत्यू झाला. पायलिनचा वेग मंदावला असून आता त्याने बिहार, छत्तीसगढकडे मोर्चा वळवला आहे.
ताशी २२० किमी या वेगाने वाहणारे पायलिन चक्रीवादळ अपेक्षेप्रमाणे शनिवारी रात्री ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर आदळले. पहिला भर ओसरल्यानंतर रविवारी सकाळपासून मात्र वादळाचा वेग मंदावला. परंतु सुरुवातीच्या तडाख्यात पायलिनने ९० लाख लोकांना फटका दिला. तर दोन हजार ४०० कोटी रुपये किमतीच्या पिकांचे नुकसान केले. या तडाख्यात २३ जण मृत्यू पावले असून त्यापैकी बहुतांश जण झाडे किंवा भिंती कोसळूनच ठार झाले.
मोर्चा बिहारकडे
सुरुवातीच्या भरानंतर पायलिनचा वेग ओसरला. सध्या पायलिन ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वाहात असून आता त्याने बिहार, छत्तीसगढ आणि झारखंड या राज्यांकडे मोर्चा वळवला आहे. असे असले तरी या वादळाचा फारसा परिणाम जाणवणार नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
बिहारमधील काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या एमव्ही बिंगो या पनामाच्या जहाजाला जलसमाधी मिळाली. मात्र, त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
१४ वर्षांनंतर
याआधी १९९९ मध्ये अशा प्रकारच्या चक्रीवादळाचा तडाखा ओडिशा किनारपट्टीला बसला होता. दहा हजार जणांचा बळी त्या चक्रीवादळाने घेतला होता. मात्र, त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ओडिशा सरकारने शर्थीचे प्रयत्न करून लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवून जीवितहानी टाळली. मात्र, या सर्व प्रपातात आंध्र व ओडिशात २४०० कोटी रुपये किमतीच्या पिकांचे नुकसान झाले आहे.