कोलकाता : पश्चिम बंगालच्या दक्षिण किनारपट्टी भागातील २४ विभाग, ७९ पालिका प्रभागांतील सुमारे १५ हजार घरांचे ‘रेमल’ चक्रीवादळाने नुकसान झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. या वादळामुळे २ हजार १४० वृक्ष तसेच ३३७ विजेचे खांब कोसळल्याचेही त्यांनी सांगितले. वादळग्रस्त भागात सरकारी कर्मचारी नुकसानीचे पंचनामे करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी ‘पीटीआय’ला दिली.
नुकसानाच्या प्राथमिक अहवालानुसार सुमारे १४ हजार ९४१ घरांचे चक्रीवादळाने नुकसान झाले. यापैकी १ हजार ३ घरे पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने २ लाख ७ हजार ६० नागरिकांचे १,४३८ निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर केले आहे. सध्या तेथे ७७ हजार २८८ नागरिकांना निवारा देण्यात आला आहे. या ठिकाणी नागरिकांना अन्नपुरवठा करण्यासाठी ३४१ स्वयंपाकघरे उभारण्यात आली असून, नागरिकांना १७ हजार ७३८ ताडपत्री वितरित करण्यात आली आहेत.
पश्चिम बंगालमधील काकद्वीप, नामखाना, सागरद बेट, डायमंड हार्बर, फ्रेजरगंज, बक्खली आणि मंदारमणी आदी परिसराला रविवारी वादळाचा तडाखा बसला. यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वादळामुळे किनारपट्टीच्या भागात पायाभूत सुविधा आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रेमल चक्रीवादळ शेजारच्या बांगलादेशात ताशी १३५ किमी प्रतितास वेगाने पोहोचल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> Cyclone Remal : चक्रीवादळाच्या तडाख्याने पश्चिम बंगालमध्ये वाताहात; झाडं कोसळली, रेल्वे गाड्याही रद्द, एकाचा मृत्यू
विक्रमी पाऊस
कोलकातामध्ये सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २४ तासांत विक्रमी १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर शेजारील साल्ट लेक परिसरात याच कालावधीत ११० मिलिमीटर पाऊस नोंदवण्यात आला. तर हुगळीच्या तारकेश्वरमध्ये दक्षिण बंगालमधील सर्वाधिक ३०० मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली.
रस्ते, रेल्वे, विमान वाहतुकीला फटका
कोलकाता शहरात चक्रीवादळाच्या तडाख्याने अनेक मोठे वृक्ष रस्त्यावर उन्मळून पडले. तसेच मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली गेल्याने सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शहराच्या काही भागातील रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. कोलकाता शहरात ६८ तर शेजारी साल्ट लेक आणि राजरहाट भागात ७५ वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुसळधार पावसाने रेल्वे, मेट्रो आणि विमान वाहतुकीलाही फटका बसला.
भिंत कोसळून एकाचा मृत्यू, दोघे जखमी
पश्चिम बंगाल आणि शेजारील बांगलादेशाच्या किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा बसला. वादळामुळे झालेल्या मुसळधार पावसात कोलकाता येथे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मध्य कोलकाता येथील एंटली येथील बिबीर बागान परिसरात रविवारी भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला. तर माणिकतला भागात आणखी दोन जण जखमी झाले.
बांगलादेशमध्ये ७ जणांचा मृत्यू
पश्चिम बंगालप्रमाणे शेजारील बांगलादेशच्या किनारपट्टी भागालाही रेमल चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. १२० किमी प्रतितास वेगाने येणारे आणि वादळामुळे येथील शेकडो गावे जलमय झाली. या वादळामुळे ७ जणांचा मृत्यू झाला, तर दीड कोटीहून अधिक नागरिक अंधारात आहेत. दरम्यान, सोमवारी सकाळी या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्याची माहिती तेथील हवामान विभागाने दिली.