पश्चिम बंगालमध्ये २ मे रोजी ममता बॅनर्जी यांचा मोठा विजय निश्चित झाला. भाजपाला पूर्ण विजय मिळवता आला नसला, तरी पक्षाच्या जागा मात्र मोठ्या प्रमाणात वाढल्या. पण निवडणूक उलटून जवळपास महिना लोटल्यानंतर देखील ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपा किंवा ममता बॅनर्जी विरुद्ध केंद्र सरकार हा वाद थांबता थांबत नाहीये. त्याचच प्रत्यंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगाल दौऱ्यामध्ये आलं. यास चक्रीवादळाचा फटका बसलेल्या पश्चिम बंगालमधील भागाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवाई पाहणी दौरा केला. मात्र, “यावेळी घडलेला घटनाक्रम धक्कादायक होता”, अशी प्रतिक्रिया भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर त्यांनी हे ट्वीट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले राजनाथ सिंह?

राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरून पश्चिम बंगाल सरकारवर अर्थात अप्रत्यक्षपणे ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. “पश्चिम बंगालमधला आजचा घटनाक्रम धक्कादायक आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान व्यक्ती नसून संस्था आहेत. दोघांनी जनतेच्या सेवेचा संकल्प आणि संविधानाबद्दल निष्ठा ठेवण्याची शपथ घेऊनच पदग्रहण केलं आहे. संकटाच्या काळात जनतेला मदत देण्याच्या भावनेने आलेल्या पंतप्रधानांसोबत अशा प्रकारचा व्यवहार दु:खदायक आहे. जनतेच्या सेवेचा संकल्प आणि संविधानाने दिलेल्या कर्तव्यांच्या वर राजकीय मतभेदांना ठेवण्याचं हे एक दुर्दैवी उदाहरण आहे. हे भारतीय संघव्यवस्थेच्या मूळ भावनेलाच धक्का पोहोचवणारं आहे”, असं राजनाथ सिंह यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

नेमकं झालं काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज यास चक्रीवादळाचा फटका बसलेल्या ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील परिस्थितीचा हवाई पाहणी दौरा केला. यानंतर ते पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल जगदीप धनकर आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबतच्या पूर्वनियोजित बैठकीसाठी पोहोचले. मात्र, या बैठकीसाठी ममता बॅनर्जी तब्बल अर्धा तास उशिराने पोहोचल्या. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जगदीप धनकर यांना तब्बल अर्धा तास ममता बॅनर्जी यांची वाट पाहावी लागली, असं वृत्त इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. राज्यपाल जगदीप धनकर यांनी दुपारी ३.४१ वाजता यासंदर्भात केलेलं ट्वीट या माहितीला दुजोरा देणारं होतं.

मीटिंगचा हा फोटो व्हायरल होत असून यामध्ये ममता बॅनर्जी गैरहजर असल्याचं दिसत आहे.

३ वाजून ४१ मिनिटांनी राज्यपालांचं ट्वीट!

“पंतप्रधानांच्या आढावा बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी हजर राहणं हे राज्याच्याच हिताचं ठरलं अतं. अशा प्रकारे वादाची भूमिका राज्यासाठी किंवा लोकशाहीसाठी धोकादायक असते. मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थित न राहणं हे लोकशाहीच्या तत्वाला किंवा कायद्याला धरून नाही”, असं ट्वीट राज्यपाल धनकर यांनी केलं होतं.

 

ममता बॅनर्जींचा बचाव!

ममता बॅनर्जी यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. “हिंगलगंज आणि सागरमध्ये आढावा बैठक घेतल्यानंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कलाईकुंड येथे भेटले. त्यांना यास चक्रीवादळानंतर पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली. यासंदर्भातला राज्य सरकारचा अहवाल त्यांना सादर करण्यात आला त्यानंतर मी दिघा येथे सुरू असलेल्या बचाव आणि पुनर्बांधणी कामाचा आढावा घेण्यासाठी निघाले”, असं ट्वीट ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.

 

निवडणुकांनंतर पहिल्यांदाच दोन्ही नेते आमने-सामने

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मीटिंग दुपारी २.३० ते ३.३० या वेळेमध्ये आयोजित करण्यात आली होती. पश्चिम मिदनापूरमधल्या कलाईकुंड भागामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी या बैठकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच आमने-सामने आले होते. दरम्यान, या बैठकीला विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांना देखील बोलावण्यात आल्यामुळे ममता बॅनर्जी यांचा पारा चढल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच त्यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास उशीर केल्याचा दावा केला जात आहे.

 

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात ट्वीट करून ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, ममता बॅनर्जी या मीटिंगसाठी गैरहजरच राहिल्याचं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील ट्वीटरच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे.

 

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील राजनाथ सिंह यांच्याच शब्दांमध्ये ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.