यूपीए सरकारच्या कार्यकाळात केवळ नव्या रेल्वेमार्गांची घोषणा करण्यावरच भर होता. गेल्या ३० वर्षांच्या काळात ६७६ प्रकल्प जाहीर करण्यात आले. पैकी फक्त ३१७ प्रकल्पच पूर्ण झाले आहेत. उर्वरित सर्व अपूर्ण आहेत, असे सांगत रेल्वेमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी मंगळवारी आपल्या पहिल्या रेल्वे अर्थसंकल्पात गेल्या सरकारच्या कारभारावर टीका केली.
सदानंद गौडा यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये मोदी सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये त्यांनी रेल्वेच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. गेल्या दहा वर्षांच्या यूपीए सरकारच्या काळात ९९ नवीन रेल्वेमार्गांची घोषणा करण्यात आली. त्यापैकी केवळ एकच मार्ग पूर्ण झाला आहे. या ९९ मार्गांपैकी ४ मार्ग तर ३० वर्षे जुने आहेत. तरीही ते अद्याप पूर्ण झालेले नाहीत, असे गौडा यांनी स्पष्ट केले. रेल्वेची आर्थिक परिस्थिती बिघडण्याला मागील यूपीए सरकार कसे कारणीभूत होते, याचे आकडेवारीसहीत उदाहरणच रेल्वेमंत्र्यांनी दिले. प्रतिप्रवासी/प्रतिकिलोमीटर रेल्वेच्या नुकसानीत २०००-०१मधील १० पैशांवरून २०१२-१३ मध्ये २३ पैशांपर्यंत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.