मध्य प्रदेशातील चंबळ खोऱ्यात एकेकाळी भीती आणि दहशत पसरवणारे कुख्यात दरोडेखोर रमेश सिंग सिकरवार आता ‘चित्ता मित्र’ बनले आहेत. ते आता स्थानिक रहिवाशांमध्ये आफ्रिकेतून आलेल्या ८ चित्त्यांचं महत्त्व पटवून देत असून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचं काम करत आहेत. १९७० ते १९८० च्या दशकात चंबळ खोऱ्यावर राज्य करणारे ७२ वर्षीय रमेश सिंग सिकरवार यांच्यावर २५० हून अधिक दरोडे आणि ७० हून अधिक खुनाचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, १९८४ मध्ये आत्मसमर्पण केल्यापासून ते समाजसेवा करत आहेत.
श्योपूर आणि मुरैना या परिसरातील १७५ गावांमध्ये रमेश सिंग सिकरवार यांना ‘प्रमुख’ म्हणून ओळखले जाते. १९८४ मध्ये त्यांनी त्यांच्या टोळीतील ३२ सदस्यांसह आत्मसमर्पण केलं होतं. त्यावेळी राज्य सरकारने त्यांच्या टोळीवर एक लाखाहून अधिक रुपयांचे बक्षीस जाहीर केलं होतं. आठ वर्षे तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर सिकरवार यांनी गुन्हेगारी विश्वाला रामराम ठोकला. आता ते कर्हाळ येथे शेती करून आपलं जीवन जगत आहेत. इतर अनेक दरोडेखोरांप्रमाणे सिकरवार हे त्यांच्या गुन्ह्यातून मुक्त झाले आहेत. मात्र, त्यांचा प्रभाव आणि प्रतिष्ठा अजूनही अबाधित आहे.
५० चित्ते भारतात आणण्याची योजना
आफ्रिकेतील नामीबीया देशातून आठ चित्ते आज १७ सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातील ‘कुनो नॅशनल पार्क’मध्ये आणले आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पुढील पाच वर्षात आणखी ५० चित्ते भारतात आणण्याची सरकारची योजना आहे. याच पार्श्वभूमीवर सिकरवार हे आपल्या दोन डझन सहकाऱ्यांसमवेत आसपासच्या गावात चित्त्यांविषयी जनजागृती निर्माण करण्याचं काम करत आहेत.
आपल्या भूतकाळावर भाष्य करताना रमेश सिंग सिकरवार म्हणाले की, १९७५ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी मी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि आपल्या लोभी काकांपासून आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी बंडखोरी केली. श्योपूर, गुना आणि मुरैना या प्रदेशात नऊ वर्षे राज्य केले, पण मी कधीही अन्यायकारक कृत्य केलं नाही. त्यामुळे लोकांमध्ये माझ्याबद्दल आदर आणि प्रभावाची भावना आहे. लोकांनी चिथावणी देईपर्यंत आम्ही कधीही त्यांच्यावर हल्ला केला नाही. चित्ताही असाच प्राणी आहे, चिथावणी दिल्याशिवाय तो कुणावरही हल्ला करत नाही, अशी प्रतिक्रिया सिकरवार यांनी दिली आहे. ते एका इंग्रजी माध्यमाशी बोलत होते.