इंटरनेटच्या महाजालात सर्वाधिक लोकप्रीय संवादाचे माध्यम फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने आनंदाची बातमी दिली आहे. झकरबर्गच्या घरी ‘नन्ही परी’ अवतरली आहे. मार्कला कन्यारत्नाचा लाभ झाला असून त्याने आपल्या चिमुकलीचे नाव मॅक्स असे ठेवले आहे.
मार्कने आपल्या चिमुकलीचे स्वागत देखील ‘सोशल’ पद्धतीने केले आहे. पत्नी प्रिसिला चान आणि मार्कने एका फेसबुकवर पोस्टच्या माध्यमातूनच त्यांची नवजात कन्या मॅक्स हिचे स्वागत करीत सर्वांना ही आनंदाची बातमी दिली. विशेष म्हणजे, मुलीच्या स्वागताची बातमी देतानाच मार्कने आपल्या कंपनीचे ९९ टक्के शेअर म्हणजेच जवळपास साडेचार हजार कोटी डॉलर दान करणार असल्याचीही घोषणा केली आहे. गरीबी हटवणे, शैक्षणिक दर्जा सुधारणे, रोगांचा सामना आणि समान अधिकारांचा प्रसार करणारी एक नवीन संस्था प्रिसी चान हिच्या पुढाकाराने मार्क सुरू करणार आहे.
मार्कने आपल्या नवजात मुलीला उद्देशून ‘अ लेटर टू अवर डॉटर’ असे एक छोटेखानी पत्र देखील फेसबुकवर पोस्ट केले आहे. मार्क पत्रात म्हणतो की, मॅक्स, तू आम्हाला भविष्यासाठी जी उमेद दिली आहेस ते सांगण्यासाठी तुझी आई आणि माझ्याकडे शब्द नाहीत. तुझं नवं आयुष्य हे वचनांनी भरलेलं आहे. तूझ्या नव्या आयुष्याचा शोध घेण्यासाठी तू नेहमी आनंदी आणि सुदृढ राहशील अशी आशा आहे. तू ज्या जगात राहशील त्यावर प्रकाश टाकण्याचं एक निमित्त तू एव्हाना आम्हाला दिलचं आहेस. सर्व पालकांप्रमाणेच आम्हालाही तू सध्यापेक्षा आणखी चांगल्या जगात वाढावीस अशी आमचीही इच्छा आहे.
तंत्रज्ञानाने माणसं भरपूर जवळं येतायत. ज्ञान वाढतयं. गरीबी कमी होतेयं. आरोग्य व्यवस्था प्रबळ होतेयं. सर्वच श्रेत्रात होणाऱया तांत्रिक प्रगतीमुळे तुला नक्कीच सध्या पेक्षा नक्कीच सर्व सुखसोयी असलेल्या चांगल्या वातावरणात जगता येईल, असे देखील मार्कने म्हटले आहे.

Story img Loader