घरात गोमांसाचा साठा ठेवल्याच्या अफवेतून दादरी येथे गावकऱयांनी महमंद अखलाख या निष्पापाला ठार केले या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? असा सवाल एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला आहे. महमंद अखलाखच्या कुटुंबियांची ओवेसी यांनी शुक्रवारी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या मुलाच्या मृत्यूवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून शोक व्यक्त केला पण महंमद अखलाखच्या मृत्यूची दखल पंतप्रधानांनी घेतली नाही. ‘सबक साथ, सबका विकास’ चा दावा करणाऱया मोदींचा फोलपणा यातून समोर आला असल्याचे ओवेसी म्हणाले. तसेच महंमद अखलाखची सुनियोजित कटातून हत्या करण्यात आल्याचा दावाही ओवेसी यांनी केला आहे.
नवी दिल्लीपासून अवघ्या ४५ किमी अंतरावर असलेल्या बिसारा गावात महंमद अखलाख याची दोन दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणाने हत्या करण्यात आली. अखलाख याने घरात गोमांसाचा साठा करून ठेवल्याची माहिती पसरताच गावकऱयांनी अखलाखच्या घरावर चाल करून त्याला बेदम मारहाण केली. गावकऱयांच्या मारहाणीत मोहमंद अखलाख यांचा मृत्यू झाला. तर, त्यांचा मुलगा गंभीर जखमी आहे. त्यानंतर अखलाख कुटुंबियांच्या घरात गोमांसाचा साठा होता ही अफवा असल्याचे समोर आले. या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

Story img Loader