देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या दादरी हत्याकांडप्रकरणी सोमवारी उत्तर प्रदेश सरकारकडून एक अहवाल प्रकाशित करण्यात आला. या अहवालानुसार मोहंमद अखलाख याच्या घरात सापडलेले मांस हे गोमांस नसून मटण असल्याचे स्पष्ट झाले. प्रथमदर्शनी पाहता मोहंमदच्या घरातील मांस हे शेळी किंवा तत्सम प्रजातीच्या प्राण्याचे असल्याचे या अहवालात सांगण्यात आले.
काही दिवसांपूर्वी या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात भाजपच्या नेत्याच्या मुलाचे नाव असून गुन्ह्य़ाची बव्हंशी जबाबदारी त्याच्याकडेच जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. ऊर्वरित आरोपींविरोधात दंगलीत सहभागी झाल्याचे गुन्हे नोंदविण्यात आले होते. आरोपपत्रात स्थानिक भाजप नेते संजय राणा यांचा मुलगा विशाल याचे नाव ठळकपणे अधोरेखित होत असल्याचे ग्रेटर नोएडाचे पोलीस अधीक्षक संजय सिंग यांनी सांगितले होते. या प्रकरणाची सुनावणी ४ जानेवारी रोजी होणार आहे.
दादरी येथील मोहंमद अखलाख यांना घरात गोमांस बाळगल्याच्या आरोपावरून जमावाने ठेचून मारल्याची नृशंस घटना २८ सप्टेंबर रोजी घडली होती. त्यांचा मुलगा दानिश या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. या घटनेमुळे देशातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते.
दादरी हत्याकांड : ‘ते’ मांस गाईचे नव्हते, पशुवैद्यकीय खात्याचा अहवाल
या प्रकरणाची सुनावणी ४ जानेवारी रोजी होणार आहे
Written by लोकसत्ता टीम
First published on: 28-12-2015 at 16:03 IST
TOPICSबीफ
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dadri lynching it was mutton not beef in akhlaq house says veterinary department