ओदिशातील दलित समाजातील मुलीला तिच्याच काकाने दोन लाख रुपयांमध्ये विकल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सुटकेसाठी पीडितेने पहिल्या मजल्यावरुन उडी मारली आणि हा प्रकार उघड झाला. पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.
ओदिशात राहणाऱ्या 15 वर्षांच्या मुलीला तिच्याच काकाने हरयाणात विकले होते. हरयाणातील भिवानी येथील कंपनीत काम करणाऱ्या कामगाराने तिला विकत घेतले होते. पीडित मुलीला घरात डांबून ठेवण्यात आले होते. बुधवारी तिने सुटकेसाठी पहिल्या मजल्यावरुन खाली उडी मारली. यात तिला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि हा प्रकार उघड झाला. पीडितेने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेला तिच्या काकाने नातेवाईकांकडे जायचे आहे असे सांगत हरयाणात नेले. हरयाणात तिला दोन लाखांमध्ये विकण्यात आले. तिथे त्या मुलीचे एका पुरुषाशी बळजबरीने लग्न लावून देण्यात आले. त्या पुरुषाने मला घरात डांबून ठेवले होते, असे पीडितेने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी पीडितेच्या वडिलांना हरयाणात बोलावले असून लवकरच तिला कुटुंबीयांकडे दिले जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीशी लग्न करणाऱ्या कामगाराला आणि त्याच्या आईला अटक केली आहे.