मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथे एका टोळक्याने १८ वर्षीय दलित तरुणाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या टोळक्याने तरुणाच्या आईला नग्न करत मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपीसह आठ जणांना अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
मृत तरुणाच्या बहिणीने २०१९ साली आरोपींविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. संबंधित खटला मागे घ्यावा, यासाठी आरोपींकडून दलित कुटुंबावर दबाव टाकला जात होता. घटनेच्या दिवशी गुरुवारी (२४ ऑगस्ट) काही आरोपी पीडितेच्या घरी गेले. यावेळी आरोपी विक्रम सिंह ठाकूर याने आधी पीडितेच्या घराची तोडफोड केली. त्यानंतर भावाची हत्या केली. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पीडितेच्या आईलाही विवस्त्र करत मारहाण केली.
हेही वाचा- देवाचा प्रसाद खाऊ घालत राक्षसी कृत्य, दिल्लीत बस कंडक्टरचा महिलेवर बलात्कार
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, नितीन अहिरवार असं हत्या झालेल्या १८ वर्षीय युवकाचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयितासह आठ आरोपींना अटक केली आहे. गावच्या सरपंचाच्या पतीसह काही आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची पथकं विविध ठिकाणी शोध घेत आहेत. पोलिसांनी ज्ञात असलेल्या एकूण नऊ आरोपींसह इतर तीन ते चार अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एससी/एसटी कायदादेखील लागू केला आहे.
हेही वाचा- धावत्या बसमध्ये कंडक्टरचा प्रवासी तरुणीबरोबर सेक्स, गैरवर्तनाचा VIDEO व्हायरल
“मी जंगलात पळत गेले अन्….”
मृत तरुणाच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी आरोपी कोमल सिंह, विक्रम सिंह आणि आझाद सिंह हे तिच्या घरी आले. त्यांनी लैंगिक छळाचा खटला मागे घेण्यासाठी दबाव टाकला. मात्र, तिच्या आईने खटला मागे घेण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या आरोपीनं पीडितेला धमकावलं आणि घराची तोडफोड केली.
“यानंतर सर्व आरोपी घरातून निघून गेले आणि गावातील बसस्थानकाजवळ नितीनला भेटले. त्यांनी नितीनला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी माझी आई भांडणात मध्यस्थी करायला गेली असता त्यांनी (आरोपींनी) तिलाही विवस्त्र करत मारहाण केली. मी त्यांना सोडण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी माझ्यावर बलात्कार करण्याची धमकी दिली. त्यानंतर मी जंगलात पळत गेले आणि मदतीसाठी पोलिसांना फोन केला,” असा खुलासा मृत तरुणाच्या बहिणीने केला.
“गुंडांनी तरुणाच्या आईलाही सोडलं नाही”
या प्रकरणानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खरगे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, “मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात एका दलित तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. गुंडांनी त्याच्या आईलाही सोडलं नाही. सागरमध्ये संत रविदास मंदिर बांधण्याचं नाटक करणारे पंतप्रधान मध्य प्रदेशात सातत्याने होत असलेल्या दलित-आदिवासी अत्याचारावर एक शब्दही बोलायला तयार नाहीत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री केवळ कॅमेरासमोर वंचितांचे पाय धुवून आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करतात.”
“भाजपाने मध्य प्रदेशला दलित अत्याचाराची प्रयोगशाळा बनवली आहे. भाजपाशासित मध्य प्रदेशात दलितांवरील गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. राष्ट्रीय आकडेवारीच्या तुलनेत हा आकडा तिप्पट आहे. मोदीजी, यावेळी मध्य प्रदेशातील जनता भाजपाच्या जाळ्यात अडकणार नाही. समाजातील वंचित आणि शोषित घटकांच्या छळवणुकीचं उत्तर तुम्हाला काही महिन्यांनंतर मिळेल. भाजपाचं विसर्जन निश्चित आहे,” असंही खरगे ट्वीटमध्ये म्हणाले.