शेळ्या चोरल्याच्या संशयावरून अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावात तीन दलितांना उलटं टांगण्यात आलं होतं. आता असाच प्रकार तेलंगणातील मंचिरियाल जिल्ह्यात घडला आहे. शेळ्या चोरल्याच्या संशयावरून येथे एका दलित व्यक्तीला आणि त्याच्या मित्राला शेडमध्ये उलटे टांगून त्यांचा अमानुष छळ करण्यात आला आहे.
हेही वाचा >> धक्कादायक! दलित असल्याने छळ होत असल्याचा आयएएस अधिकाऱ्याचा आरोप, वर्षभरात पाच वेळा बदली
कोमुराजुला रामुलू यांच्या शेळ्या बेपत्ता झाल्या होत्या. शेळी चोरल्याच्या संशयावरून एक गुराखी तेजा आणि त्याचा दलित मित्र चिलुमुला किरण यांना शेडमध्ये बोलावण्यात आले. रामुलू, त्याची पत्नी आणि मुलाने त्या तिघांना उलटे लटकवले आणि बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर उलटं टांगून त्यांना धुरी देण्यात आली. हा प्रकार समोर येताच संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा >> “महाराष्ट्रात जातीय अत्याचार”; चोरीच्या संशयावरून दलित तरुणांना झाडावर टांगलं, प्रकाश आंबेडकरांचा दावा
याप्रकरणी किरणच्या पत्नीने पोलिसांत धाव घेतली. तिने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. बेल्लमपल्ली एसीपी सदैया आणि एसएसआय चंद्रकुमार यांनी शनिवारी घटनास्थळाची पाहणी केली. तर, याप्रकरणी कोमुराजुला रामुलू, त्यांची पत्नी स्वरूपा आणि मुलगा श्रीनिवास या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
महाराष्ट्रातही घडला होता प्रकार
अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावात तीन दलित तरुणांना उलटं टांगण्यात आलं होतं. कबुतरे आणि शेळ्या चोरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला होता. तर, हेरगावमध्ये या निषेर्धार्थ बंदही पाळण्यात आला होता.