औरैया (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात अछलदा येथे एका शिक्षकाच्या मारहाणीत दहावीतील दलित विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. यानंतर संतप्त जमावाने या घटनेचा निषेध करून निदर्शने केली. तसेच दगडफेकही केली. पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, या घटनेच्या निषेधार्थ ‘भीम आर्मी’चे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचल्यानंतर निदर्शने केली. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली व पोलिसांचे वाहन पेटवून दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनावर दगडफेकही केली.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा व माजी मुख्यमंत्री मायावती यांनी वेगवेगळ्या ‘ट्वीट’द्वारे गंभीर आरोप करत सरकारला कोंडीत पकडले. बिधुना मंडलाधिकारी महेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले, की आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील कारवाई केली जात आहे. शाळा निरीक्षक चंद्रशेखर मालवीय यांनी सांगितले, की शाळेच्या पर्यवेक्षकासह आरोपी शिक्षकाला निलंबित केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैसोली गावात राहणारा निखिलकुमार (वय १५) हा  दहावीत होता. निखिलचे वडील राजू दोहरा यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की ७ सप्टेंबर रोजी अश्विनी सिंग या सामाजिक शास्त्राच्या शिक्षकाने परीक्षेत दोन चुका केल्याबद्दल आपल्या मुलाला लाथा-बुक्क्या व काठीने मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

Story img Loader